Cricketer Died While Celebrating Teams Victory: क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सामना जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करताना एका क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये घडली आहे. संघाच्या कर्णधाराने सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवण्याचा प्रयच्न केला, पण त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही.
रविवारी (१२ ऑक्टोबर) मुरादाबादमध्ये यूपी व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनकडून टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुरादाबाद आणि संभल या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू होता. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या मुरादाबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर ९ गडी बाद १३४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या संभल संघाला २० षटकांअखेर ६ गडी बाद १२१ धावांपर्यंत मजल मारता आली. मुरादाबाद संघाकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी अहमर खान गोलंदाजीला आला. शेवटच्या षटकात आपल्या संघाला विजय मिळताच अहमर खानने हात वर करून जल्लोष केला. पण इतक्यात तो जमिनीवर पडला. संघातील खेळाडूंनी त्याला सीपीआर दिला. पण सीपीआर देऊनही कुठलीही हालचाल न जाणवल्याने त्याला तातडीने जवळच्या रूग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
क्रिकेटच्या मैदानावर विजय मिळवल्यानंतर जल्लोष करणारा अहमर खान आयुष्याच्या शर्यतीत मात्र हरला. अहमर खानचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे, ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. पण या गोष्टीवर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. अहमर खान हा माजी भारतीय खेळाडू पियूष चावलासोबत लोकल क्रिकेटमध्ये बरेच सामने खेळला होता.
अहमर खान हा मुराबादमध्ये खूप प्रसिद्ध होता. बऱ्याच वर्षांपासून तो त मुरादाबादकडून माजी खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेत होता. तो आपल्या मैदानावर आपल्या खिलाडूवृत्तीसाठी आणि मैदानाबाहेर आपल्या चांगल्या स्वभावासाठी प्रसिद्ध होता. ही घटना अतिशय दुखद असल्याचं स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितलं.