Shreyas Iyer Leaves India A Captaincy: आशिया चषकादरम्यान भारत अ संघ आणि ऑस्ट्रेलिया अ संघांमध्ये अनऑफिशियल कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. ही मालिका भारतात खेळवली जात असून या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताच्या अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने कर्णधारपद सोडत अचानक संघातून आपलं नाव मागे घेतलं आहे.
श्रेयस अय्यरने संघातून नाव मागे घेतल्यानंतर तो तातडीने मुंबईला परतला आहे. श्रेयसच्या या निर्णयाने टीम मॅनेजमेंट आणि चाहत्यांना चकित केलं आहे. श्रेयसने माघार घेतल्याबद्दल अचानक ध्रुव जुरेलला संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रेयस अय्यर अचानक मुंबईला का परतला याबाबत अद्याप कोणतही अधिकृत कारण समोर आलेलं नाही.
श्रेयस अय्यरची संघाची साथ सोडत अचानक मुंबईला का परतला?
सूत्रांच्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरच्या मुंबईला जाण्यामागे वैयक्तिक कारण आहे. त्याच्या जाण्यानंतर उपकर्णधार ध्रुव जुरेल संघाचे नेतृत्व करेल. अय्यरच्या जागी संघात इतर कोणत्याही खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. अय्यरने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयकडे रजा मागितली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अय्यरने दुसऱ्या सामन्यातील त्याच्या अनुपस्थितीबद्दल निवडकर्त्यांना आधीच माहिती दिली होती आणि संघ निवडकर्ते वेस्ट इंडिज मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे.
आयपीएलमधील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर, अय्यरला सध्या सुरू असलेल्या आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची अपेक्षा होती, परंतु त्याला संघात स्थान मिळालं नाही आणि स्पर्धेसाठी त्याची निवड न झाल्याबद्दल माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. भारत अ संघ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर फारशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही. मोठ्या धावसंख्येचा हा पहिला सामना अनिर्णित राहिला.
भारत अ संघात दुसऱ्या अनऑफिशियल कसोटीसाठी बदल
अय्यरच्या अनुपस्थितीव्यतिरिक्त, संघात आणखी एक बदल करण्यात आला आहे. खलील अहमदच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आले आहे. मोहम्मद सिराजने या सामन्यात सॅम कॉन्स्टासला बाद करत एक विकेट घेतली आहे. तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया अ संघाने ७८ षटकांत आतापर्यंत ८ विकेट्स गमावत ३०० धावा केल्या आहेत. भारताकडून मानव सुतारने ५ विकेट्स घेतले आहेत.