Shubman Gill On Father Message After 269 Runs: भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटीत २६९ धावांची विक्रमी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्या कसोटी सामन्यात शतक केल्यानंतर आता गिलने दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावत अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. थोडक्यासाठी गिलचं शतक मात्र हुकलं. या विक्रमी खेळीनंतर शुबमन गिलचे वडील नेमकं काय म्हणाले, हे त्याने सांगितलं आहे.
शुबमन गिलच्या शतकी खेळीनंतर बीसीसीआयने त्याचा एक खास व्हीडिओ शेअर केला आहे. शुबमन गिलच्या या व्हीडिओमध्ये त्याचे वडील आणि त्याची आई त्याच्या खेळीबद्दल त्याचे कौतुक करताना दिसले. शुबमन गिल २६९ धावांची खेळी करत बाद झाला, त्यामुळे अवघ्या काही धावांसाठी त्याचं पहिलं त्रिशतक हुकलं. याबद्दलचं त्याच्या बाबांनी त्याला म्हटलं.
बीसीसीआयने कॅप्टन गिलच्या या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विक्रमी खेळी केल्यानंतर, गिलचे टीम हॉटेलमध्येही जोरदार स्वागत करण्यात आले. बोलताना गिल हसत म्हणाला- मी रिकव्हरीसाठी पूलमध्ये गेलो होतो, परत आलो, आंघोळ केली, मी जेवत होतो आणि तुम्ही लोकांनी मला अडवून हे रेकॉर्ड करायला सांगितलं.
गिल या व्हीडिओमध्ये म्हणतोय, “वडिलांकडून हा मेसेज येणं खूप मोठी गोष्ट आहे., पण ते मला असंही म्हणाले की माझं त्रिशतक झळकावण्यात अपयशी ठरलो, याचं दु:ख त्यांना आहे.”
बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये त्याच्या आई आणि वडिलांचा त्याच्या विक्रमी खेळीनंतर आलेला मेसेज ऑडिओ रूपात त्याला ऐकवला. यामध्ये त्याचे वडील म्हणत आहेत की, “तू खूप छान खेळलास, आज तुझी फलंदाजी पाहून मला खूप आनंद झाला. तू जसा अंडर-१६, अंडर-१९ मध्ये खेळायचास तशी आजची तुझी खेळी दिसत होती. मला तुझा खूप अभिमान वाटतोय.”
गिलची आई पुढे म्हणाली, “तुझी फलंदाजी पाहून खूप बरं वाटलं. असाच कायम पुढे जात रहा, तुला खूप खूप शुभेच्छा.” त्याच्या आई-वडिलांचा मेसेज ऐकताना शुबमनच्या चेहऱ्यावर मोठं हास्य होतं. या मेसेजवर प्रतिक्रिया देताना शुबमन म्हणाला, “वडिलांनी केलेलं कौतुक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी लहानपणापासून खरंतर माझ्या वडिलांसाठी क्रिकेट खेळतो. मी त्यांच्यामुळे क्रिकेट खेळायला सुरूवात केली. त्यांच्याबरोबर माझा एक मित्र असायचा, ज्याच्याबरोबर मी सराव करायचो. माझ्या क्रिकेटसंबंधित कोणतीही गोष्ट असली तर मी फक्त या दोघांचं ऐकतो.”
शुभमन गिलने एजबॅस्टन कसोटीत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. शुबमन गिल हा कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात मोठी खेळणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. गिलने फक्त द्विशतक झळकावलं नाही तर त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण भागीदारीही रचल्या. ज्यामुळे टीम इंडिया ५८७ धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकली.