Kusal Perera Catch: आशिया चषकातील सुपर ४ मध्ये जाण्यासाठी अतिशय महत्वाच्या सामन्यात अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. अफगाणिस्तानला सुपर ४ मध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. त्यामुळे या सामन्यात अफगाणिस्तानने मोठी धावसंख्या उभारण्यासाठी पूर्ण जोर लावला. दरम्यान अफगाणिस्तानला रोखण्यासाठी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. यादरम्यान खेळाडूंनीही त्यांना चांगली साथ दिली. कुसल परेराने सीमारेषेवर भन्नाट झेल घेतला ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कुसल परेराने घेतला भन्नाट झेल
या सामन्यात दरविश रसूलीला बाद करण्यासाठी कुसल परेराने सीमारेषेवर एकच नंबर झेल घेतला. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तर झाले असे की, अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला होता. अफगाणिस्तानला चांगली सुरूवात मिळाली होती. अफगाणिस्तानकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दरविश रसूली आला होता. दरविश रसूली १६ चेंडूत ९ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी ११ वे षटक टाकण्यासाठी दुष्मंता चमीरा गोलंदाजीला आला. या षटकातील तिसरा चेंडू चमीराने ऑफ साईडच्या दिशेने टाकला. या चेंडूवर दरविश रसूलीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याने मारलेला चेंडू सीमारेषेच्या वरून जात होता. पण परेराने उडी मारून आधी चेंडू अडवला. त्याचा पाय सीमारेषेच्या बाहेर जाणार होता. इतक्यात त्याने चेंडू आत फेकून हवेत उडवला आणि मग पुन्हा आत येऊन शानदार झेल घेतला.
हा झेल पाहून खेळाडूंसह फलंदाजही आश्चर्यचकीत झाले. पंचांनी तपासून पाहिलं, ज्यात हा झेल योग्यरित्या टिपल्याचं स्पष्ट झालं. यासह दरविश रसूलीचा डाव अवघ्या ९ धावांवर आटोपला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकअखेर ८ गडी बाद १६९ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गोलंदाजी फलंदाजी करताना सलामीला आलेल्या रहमनुल्लाह गुरबाजने १४ धावा केल्या, तर सेदिकुल्लाह अटल १८ धावांवर माघारी परतला. इब्राहिम जादरानने २४ धावांची खेळी केली. शेवटी फलंदाजी करताना मोहम्मद नबीने नाबाद ५९ धावांची खेळी केली. तर राशिद खानने २४ धावांची खेळी केली.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
अफगाणिस्तान- राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, सेदिकुल्लाह अटल, गुलबदीन नइब, दरविश रसूली, करीम जनत, मुजीब उर रहमान, अजमतुल्लाह उमरजई, नूर अहमद, फजलहक फारूकी.
श्रीलंका- चरिथ असलंका (कर्णधार) पथुम निसंका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कामिल मिशारा, कुसल परेरा, दासुन शनाका, कामिंदू मेंडिस, डुनिथ वेलालगे, वानिंदु हसरंगा, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा.