India vs South Africa Final : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वाडने खणखणीत शतक ठोकून सर्वांचीच मने जिंकली. भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना तिने ९८ चेंडूत १०१ धावांची आक्रमक खेळी केली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकवणारी लॉरा जगातील पहिली महिला ठरली. यासह ऑस्ट्रेलियाची आक्रमक फलंदाज एलिसा हेलीला मागे टाकून तिने नव्या विक्रमाला गवासणी घातली. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं.
या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव केवळ २६४ धावांवरच गुंडाळला. गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात तब्बल ५२ धावांनी विजय मिळला. आफ्रिकेकडून आलेल्या लॉराने ११ चौकार आणि एका षटकारासह १०१ धावा केल्या. या खेळीमुळे महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी ती पहिली महिला खेळाडू झाली आहे. लॉराने ऑस्ट्रेलियाची आक्रमक फलंदाज एलिसा हिलीचा विक्रम मोडला आहे. हिलीने २०२२ मध्ये झालेल्या विश्वचषकात ५०९ धावा केल्या होत्या. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत लॉराने दोन शतकी खेळीसह ५८४ चोपल्या आहेत.
आणखी वाचा : IND vs SA Final : अमनज्योत कौरचा रॉकेट थ्रो, अचूक लक्ष्य अन् मैदानावरील सर्वच अवाक्; VIDEO होतोय व्हायरल
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू
- लॉरा वोल्वाडने ५८४ धावा – २०२५ विश्वचषक
- एलिसा हिली ५०९ धावा २०२२ विश्वचषक
- रॅचेल हेन्स ४९७ धावा २०२२ विश्वचषक
- डेबी हॉकले ४५६ धावा १९९७ विश्वचषक
भारत विरुद्ध आफ्रिका सामन्याचा आढावा…
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुसरीकडे भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या स्मृती मानधनाने ४५ तर शफाली वर्माने ८७ धावांची खेळी केली. सेमीफायनल सामन्यातील हिरो जेमिमा रॉड्रिग्ज या सामन्यात २४ धावांवर माघारी परतली; तर हरमनप्रीत कौरने २०, दीप्ती शर्माने ५८, अमनजोत कौरने १२, रिचा घोषने ३४ आणि राधा यादवने ३४ धावांची खेळी केली. भारताने ५० षटकांअखेर २९८ धावा केल्या होत्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दिमाखात सुरुवात केली होती. पहिली काही षटके सावध फलंदाजी केल्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर अचानक आक्रमण केलं. नवव्या षटकांत आफ्रिकेचा डाव बिनबाद पन्नाशीपार पोहोचला होता. त्यामुळे भारतीय संघावरील दडपण वाढत होतं. त्याचवेळी अमनज्योत कौरने उत्तम क्षेत्ररक्षण करीत सुरेख फलंदाजी करणाऱ्या तॅझमिन बिट्सला धावबाद केलं. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ॲनेके बॉशला डावखुरी फिरकीपटू श्री चरणीने भोपळाही फोडू दिला नाही. एका बाजूला एकेक फलंदाज बाद होत असताना कर्णधार लावुरा वुल्फार्ट मैदानावर तग धरून होती. तिने केलेल्या शतकी खेळीला भारतीय प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम दिलं. लॉराने १०१ धावांची खेळी करून आफ्रिकेला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत हा विश्वचषक आपल्या नावावर केला.
