AUS vs SA, Heroes Of South Africa Historic Win: दक्षिण आफ्रिका संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे. तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली असं काही करून दाखवलं आहे, जे गेल्या २७ वर्षांत कोणालाच जमलं नव्हतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची मानाची गदा पटकावली आहे. नेहमी आयसीसी स्पर्धेतील सेमीफायनल आणि फायनलमध्ये प्रवेश करून पराभवाची चव चाखणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने यावेळी विजयाचा गुलाल उधळला आहे. दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात सर्व ११ खेळाडूंनी मोलाचं योगदान दिलं. दरम्यान ५ असे खेळाडू आहेत, जे या ऐतिहासिक विजयाचे हिरो ठरले आहेत.

तेंबा बावूमा

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमा या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो ठरला आहे. ज्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं खूप कठीण होतं, त्या खेळपट्टीवर तेंबा बावूमाने टिचून फलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात ३६ धावांची खेळी केली. ही खेळी या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरली. या खेळीदरम्यान त्याने बेडिंघमसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने ८४ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना त्याने एडेन मारक्रमसोब मिळून मोठी भागीदारी केली. या डावात त्याने ६६ धावांची खेळी केली.

एडेन मारक्रम

एडेन मारक्रम या फलंदाजी लाईनअपमधील सर्वात अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या डावात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या डावात तो ६ चेंडू खेळून शून्यावर माघारी परतला. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २८२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना एडेन मारक्रमने आधी मुल्डरसोबत मिळून महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने दमदार शतकी खेळी केली. यासह बावूमासोबत मिळून १५० हून अधिक धावांची भागीदारी केली.

कगिसो रबाडा

इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकण्यासाठी वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी संघातील प्रमुख गोलंदाजाने विकेट काढून देणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी संघाला खूप जास्त गरज होती. त्यावेळी कगिसो रबाडाने संघाला विकेट्स काढून दिल्या. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ५१ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ५९ धावा खर्च करत ९ गडी बाद केले. दोन्ही डावात मिळून त्याने ९ गडी बाद केले.

डेव्हिड बेडिंघम

डेव्हिड बेडिंघमने देखील दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला होता. त्यावेळी बेडिंघम खंबीरपणे उभा राहिला. त्याने कर्णधार तेंबा बावूमासोबत मिळून अर्धशतकी भागीदारी केली. या डावात त्याने १११ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. ही पहिल्या डावातील दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम खेळी ठरली.

लुंगी एन्गिडी

लुंगी एन्गिडीने कगिसो रबाडाला चांगली साथ दिली. ज्यावेळी वेगवान गोलंदाजांना मदत मिळत नव्हती. त्यावेळी लुंगी एन्गिडीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून महत्वाच्या विकेट्स काढून दिल्या. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. पण,दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ३ गडी बाद केले.