South Africa Enters Semi Final Afghanistan Eliminiated: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटातील सेमीफायनलमध्ये जाणारा संघ निश्चित होण्यासाठी इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना खूप महत्त्वाचा होता. पण या मोठ्या सामन्याचा एक डाव संपताच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ब गटातून आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला होता, पण आता दक्षिण आफ्रिका हा ब गटातून सेमीसाठी पात्र ठरलेला दुसरा संघ ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण इंग्लंडचा संघ संपूर्ण ५० षटकंही खेळू शकला नाही. आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लिश संघ अवघ्या ३८.२ षटकांत सर्वबाद झाला. जो रूट वगळता इतरा कोणत्याच खेळाडूला ३० धावांचाही टप्पा गाठता आला नाही आणि परिणामी इंग्लंड १७९ धावा करत सर्वबाद झाला.

इंग्लंडचा संघ अफगाणिस्तानने केलेल्या पराभवामुळे आधीच चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला होता. यानंतर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचला तर इंग्लंड-आफ्रिका यांच्या सामन्यावर अफगाणिस्तानचे भवितव्य अवलंबून होते. पण इंग्लंड संघ १७९ धावांवर सर्वबाद झाल्याने आफ्रिकेचा संघ आपसूकच सेमीफायनलसाठी पात्र ठरला. अफगाणिस्तानच्या संघाला सेमीफायनलसाठी पात्र ठरण्याकरता इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला २०७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करणं गरजेचं होतं. पण इंग्लंडचा संघ २०० धावा करण्याआतच सर्वबाद झाला.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याचा वनडेचा कर्णधार म्हणून हा अखेरचा सामना असणार आहे. पण या सामन्यात इंग्लंडची अवस्था अधिक बिकट झालेली पाहायला मिळाली. इंग्लंडकडून फिल सॉल्ट ८ धावा करत तर बेन डकेट २४ धावा करत बाद झाले. तर जॅमी स्मिथला खातेही उघडता आले नाही. या तिन्ही फलंदाजांना मार्काे यान्सने बाद केले. यानंतर जो रूट चांगल्या फॉर्मात होतास, त्याने ४४ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ३७ धावा करत संघाचा जाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण मुल्डरच्या गोलंदाजीवर तो बोल्ड झाला. यानंतर ब्रुक आणि बटलर १९ आणि २१ धावा करत बाद झाले. आर्चर आणि बटलरने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघेही आफ्रिकेच्या गोलंदाजीपुढे अपयशी ठरले.

आफ्रिकेकडून मार्काे यान्सन आणि वियान मुल्डर याने प्रत्येकी ३-३ विकेट घेतले. तर केशव महाराजने २ आणि एनगिडी रबाडाने प्रत्येकी १ विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीसह उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत इंग्लिश संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa enters semifinal as england all out on lowest total of 179 runs afghanistan eliminated bdg