नवी दिल्ली : आगामी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. क्रीडा मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट करताना बहुदेशीय स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापासून रोखले जाणार नाही असे म्हटले आहे. मात्र, त्याच वेळी या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत भारत किंवा पाकिस्तानच काय, तर त्रयस्थ ठिकाणीही द्विदेशीय मालिका होणार नसल्याची भूमिका क्रीडा मंत्रायलाने घेतली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या माजी खेळाडूंच्या स्पर्धेत (वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिंजड्स) भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीच्या लढतीवरही पाणी सोडले होते. पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान या संघांना एकाच गटात स्थान देण्यात आल्यानंतर त्यांच्यातील लढतीबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.

पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही, याबाबतचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. आम्ही केवळ त्यांच्या आदेशाचे पालन करतो, अशी भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) घेतली जाते. आता क्रीडा मंत्रालयाने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची परवानगी दिल्याने उभय संघांत ठरल्याप्रमाणे १४ सप्टेंबरला साखळी लढत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बाद फेरी आणि अंतिम फेरीतही ते आमनेसामने येऊ शकतील.

मंत्रालयाने पाकिस्तानवर भर देऊन भारताच्या आंतरराष्ट्रीय सहभागासंदर्भात नवे धोरण जाहीर केले. मंत्रालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय खेळाडूंना पाकिस्तानात जाण्यास बंदी घालणारे आणि शेजारील देशाच्या खेळाडूंना द्विपक्षीय सामन्यांसाठी भारतात येण्यास मनाई करणारे हे धोरण तात्काळ लागू झाले आहे.

‘भारतीय संघ पाकिस्तानमधील द्विदेशीय स्पर्धांमध्ये भाग घेणार नाहीत. तसेच आम्ही पाकिस्तानी संघांना द्विदेशीय स्पर्धांसाठी भारतात खेळण्याची परवानगी देणार नाही,’ असे मंत्रालयाच्या नव्या धोरणात नमूद करण्यात आले आहे. ‘‘भारत आणि पाकिस्तान द्विदेशीय मालिका अमेरिकेत नियोजित असली तरी त्यातही संघाला खेळू दिले जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत द्विदेशीय स्पर्धा होणार नाहीत,’’ असे मंत्रालयातील सूत्राने सांगितले.

असे असले तरी, बहुदेशीय स्पर्धांत या दोन देशांच्या संघांतील लढत शक्य आहे. ‘‘आशिया चषक ही बहुदेशीय स्पर्धा आहे. त्यामुळे त्यात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापासून आम्ही रोखणार नाही. बहुदेशीय स्पर्धांबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कोणताही अडथळा आणणार नाही. स्पर्धा पाकिस्तानात होणार असेल, तर मात्र त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल,’’ असे सूत्राकडून सांगण्यात आले.

बहुदेशीय स्पर्धांसाठी पाकिस्तानच्या संघांना प्रवेश

क्रीडा मंत्रालयाच्या नव्या धोरणामुळे आता पाकिस्तानच्या संघांना भारतात होणाऱ्या स्पर्धांमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. भारताने २०३० ची राष्ट्रकुल स्पर्धा, तर २०३६ ची ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचे स्वप्न बाळगले आहे. या दोन्ही स्पर्धांचे यजमानपद भूषविताना ऑलिम्पिक चळवळीला साजेशी सर्वसमावेशक भूमिका घेण्यास भारत वचनबद्ध असल्याचे धोरणात नमूद करण्यात आले आहे. याच कारणास्तव, महिनाअखेरीस बिहार येथे सुरू होणाऱ्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा मंजूर करण्यात आला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली. ‘‘भारतीय संघ आणि खेळाडू, पाकिस्तानचा सहभाग असलेल्या बहुदेशीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळू शकतील. त्याचप्रमाणे, पाकिस्तानी खेळाडू आणि संघ भारताने आयोजित केलेल्या बहुदेशीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतील,’’ असे धोरणात म्हटले आहे.

‘बीसीसीआय’च्या निवडणुका नव्या विधेयकानुसार?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुका नव्या क्रीडा विधेयकानुसार झाल्या तर आवडेलच. मात्र, नवीन कायद्याचे नियम त्या वेळेपर्यंत अधिसूचित झाले नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार, ‘बीसीसीआय’च्या निवडणुका होऊ शकतील, असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्राकडून सांगण्यात आले. लोढा समितीच्या शिफारशींनुसार, पदाधिकाऱ्याचे वय ७० वर्षांपेक्षा अधिक असू शकत नाही. मात्र, नव्या क्रीडा धोरणानुसार ७०-७५ वयोगटातील व्यक्तींना निवडणूक लढवण्याची परवानगी आहे. ‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्यांसाठीच्या तरतुदींमध्ये वयाची कोणतीही मर्यादा नाही. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच वयाची सत्तरी गाठली. मात्र, ‘बीसीसीआय’ने अंतरिम अध्यक्षाची निवड केलेली नाही.