‘स्पॉट-फिक्सिंग’ करण्यासाठी एस. श्रीशांतला सट्टेबाजांनी दिलेली रक्कम त्याच्या एजंटकडून जप्त करण्यात आली आहे, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला. ‘‘श्रीशांतने जयपूरमधील वास्तव्यादरम्यान तसेच अटक होण्याच्या एक दिवसआधी मुंबईतून ७ लाख ४१ हजार रुपयांची खरेदी केली होती. त्यापैकी त्याने चार लाख रुपयांचे बिल क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भरले होते. श्रीशांतचा एजंट अभिषेक शुक्ला याच्या अंधेरी येथील घरातून साडेपाच लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. श्रीशांतचे सर्व व्यवहार शुक्ला सांभाळत असल्यामुळे खरेदीनंतर शुक्लाने सर्व पैसे एका काळ्या बॅगेत आपल्या घरात ठेवले होते. सट्टेबाज आणि श्रीशांतचा मित्र जिजू जनार्दन याच्या सांगण्यावरूनच शुक्लाने श्रीशांतच्या हॉटेलमधील अन्य सामान गायब केले होते. शुक्ला हॉटेलमध्ये आल्याचे सीसीटीव्ही चित्रणामध्ये स्पष्ट दिसत आहे,’’ असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय दंड विधानअंतर्गत २०१ कलमानुसार पुरावे नष्ट केल्याप्रकरणी शुक्लाला अटक करण्यात आली होती. गुरुवारी त्याला स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला.