दिमाखदार खेळासह आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचे मायदेशात जल्लोषात स्वागत झाले. विमानतळापासून ‘श्रीलंका क्रिकेट मंडळा’च्या कार्यालयापर्यंत एका खुल्या बसमधून संघांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठय़ा प्रमाणावर चाहते उपस्थित होते. श्रीलंकेच्या संघाने सातत्यपूर्ण प्रदर्शनासह स्पर्धेत अपराजित राहण्याची किमयाही केली. वर्षभरापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांचा सहभाग असलेल्या मायदेशात झालेल्या तिरंगी स्पर्धेच्या जेतेपदानंतर हे श्रीलंकेचे पहिलेच जेतेपद आहे. ‘‘संघाच्या विजयाचे श्रेय प्रत्येक खेळाडूच्या मेहनतीला आहे,’’ असे श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने सांगितले.