IND vs PAK Asia Cup 2025 Sunil Gavaskar Remark: भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव करत आशिया चषकातील सलग दुसरा विजय नोंदवला आहे. भारताने सामन्याच्या सुरूवातीपासूनच पाकिस्तान संघावर आपला दबदबा कायम राखला आणि त्यांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. या पराभवानंतर भारतीय संघाने हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने पाकिस्तान संघाच्या जखमांवर मीठ लावलं. दरम्यान पाकिस्तानची कामगिरी पाहून सुनील गावस्कर यांनी वक्तव्य केलं आहे.

आशिया चषकातील पाकिस्तान संघाच्या कामगिरीबद्दल अनेक दिग्गजांनी वक्तव्य केलं आहे. पण, सुनील गावस्करांनी पाकिस्तानी क्रिकेटच्या ६५ वर्षांच्या इतिहासावरून निष्कर्ष लावत मोठं वक्तव्य केलं.

पाकिस्तानचा पूर्वीचा संघ आणि सध्याचा संघ यांची तुलना करत सुनील गावस्कर यांनी वक्तव्य केलं. पाकिस्तानच्या संघात एकापेक्षा एक कमाल वेगवान गोलंदाज असायचे. पाकिस्तानचा संघ मुळात वेगवान गोलंदाजांसाठी ओळखला जात असे. याशिवाय पाकिस्तान अनेकदा आशिया चषक चॅम्पियन राहिला आहे. पण भारताविरूद्ध सामन्यात संघाची कामगिरी फारच वाईट राहिली.

माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी सोनी टीव्हीवर बोलताना आपलं मत व्यक्त केलं. सुनील गावस्कर म्हणाले की, “इरफान पठाण, वीरेंद्र सेहवाग माझ्या मताशी सहमत असतील. मी १९६० पासून पाकिस्तान संघ पाहत आलो आहे. हनीफ मोहम्मद यांना क्रिकेट खेळताना पाहण्यासाठी मी चर्चगेट स्टेशनवरून ब्रेबॉर्न स्टेडिमकडे धावत गेलो होतो. तेव्हापासून मी हा संघ पाहतोय. पण यावेळेस या सामन्यात पाहता एवढ्या वर्षांनंतर पहिल्यांदा मला असं वाटलं की पाकिस्तान नाही हा कोणतातरी पोपटवाडी संघ आहे.”

सुनील गावस्करांचं शेवटचं वाक्य ऐकून सर्वच जण एकदम हसू लागले. सुनील गावस्कर यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला खेळताना गेली ६५ वर्षे पाहत आहेत आणि यादरम्यान सध्याच्या पाकिस्तान संघाला पोपटवाडी संघ म्हणत त्यांनी त्यांच्या कामगिरीवर टीका केली आहे.

सुनील गावस्करांनी पाकिस्तानला पोपटवाडी टीम का म्हटलं?

सुनील गावस्करांच्या मते पोपटवाडी संघ म्हणजे फारच कमकुवत किंवा संघाचं नाव मोठं आहे पण कामगिरी त्या दर्जाची नव्हती असं त्यांनी म्हटलं आहे. सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानी संघाबद्दल असं का म्हटले याचं कारण म्हणजे, सध्याच्या संघात आता पूर्वीसारखी वेगवान गोलंदाजीची ताकद राहिलेली नाही. २०२५ च्या आशिया चषकात पाकिस्तानी संघ त्यांच्या वेगापेक्षा फिरकी गोलंदाजीवर जास्त अवलंबून असल्याचे दिसून आले. तर संघाचे मुख्य वेगवान गोलंदाज संघाबाहेर होते.