‘वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची पातळी फारच खालावली आहे. त्यांच्यापेक्षा नेट बॉलर्स चांगले’, अशा खरमरीत शब्दांत भारताचे माजी कर्णधार आणि लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी टीका केली आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आहे. अहमदाबाद कसोटीत भारताने वेस्ट इंडिजवर अवघ्या अडीच दिवसात विजय मिळवला. भारताने ही कसोटी एक डाव आणि १४० धावांच्या फरकाने जिंकली.
‘एक काळ होता जेव्हा वेस्ट इंडिजच्या संघाचा जागतिक क्रिकेटवर दबदबा होता. रोहन कन्हाय, सेयमोर नर्स, क्लाईव्ह लॉईड, गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स असे दिग्गज वेस्ट इंडिज संघात होते. यांच्याविरुद्ध खेळताना प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडायची. आताच्या संघामध्ये तशी क्षमताच दिसत नाही. गतवैभवाची जराशीही झलक या खेळाडूंमध्ये दिसत नाही. सर गारफिल्ड सोबर्स, व्हिव रिचर्ड्स, ब्रायन लारा असे खेळाडू वेस्ट इंडिजकडून खेळले. शतकातून एकदा जन्माला येणारे असे हे प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांच्या तोडीचे खेळाडू घडणं कठीणच आहे पण या खेळाडूंमध्ये तशी आस दिसत नाही’, असं गावस्कर यांनी लिहिलं आहे. स्पोर्ट्सस्टार मासिकात त्यांनी यासंदर्भात आपले विचार मांडले आहेत.
‘जयडेन सील्सचा अपवाद वगळता बाकी गोलंदाज अतिशय सर्वसाधारण वाटले. आपले नेट बॉलर्स यापेक्षा चांगली गोलंदाजी करतात. ७-८ षटकं टाकल्यावर त्यांनी पहिला बाऊन्सर टाकला. त्यांचा अपमान करण्याचा हेतू नाही पण भारतीय गोलंदाजांनी त्यांचा समाचार घेणे साहजिक होते. बाऊन्सर टाकण्यासाठी कष्ट असतात याची मला कल्पना आहे. पण उष्ण आणि दमट वातावरणात फलंदाजांना रोखण्यासाठी तो एक उत्तम मार्ग आहे. अचानक उसळणारा चेंडू टाकून फलंदाजांना अडचणीत टाकता येतं. मात्र या गोलंदाजांमध्ये तशी इच्छा आणि तयारी दिसलीच नाही. त्यांच्या अभ्यासही कमी असल्याचं जाणवलं. त्यांच्याकडे ना वेग आहे ना अचूकता ना वैविध्य. फलंदाजांना रोखण्यासाठी जी अस्त्रं लागतात तीच दिसत नाहीत’, असं गावस्कर म्हणाले.
हेल्मेट आणि अन्य उपकरणांची साथ नसताना गावस्कर यांनी वेस्ट इंडिजमध्ये भल्याभल्या गोलंदाजांविरुद्ध दमदार खेळी साकारल्या. तंत्रशुद्ध फलंदाजीचा वस्तुपाठ असं त्यांच्या फलंदाजीचं वर्णन केलं जातं.