Asia Cup 2025 Suryakumar Yadav completes ICC hearing over Pakistan: भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तक्रार दाखल केली होती. तर आयसीसीने देखील पाकिस्तानी बोर्डाची ही तक्रार स्वीकारली होती. यामुळे सूर्याला आयसीसीच्या सुनावणीसाठी हजर राहावं लागलं होतं. याबाबतची मोठी अपडेट आता समोर आली आहे.

आशिया चषक २०२५ च्या साखळी सामन्यात पाकिस्तानवर सात विकेट्सनी विजयानंतर सूर्यकुमार यादवच्या वक्तव्याबाबत पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आयसीसीने हे प्रकरण चौकशीसाठी मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांच्याकडे पाठवले.

रिची रिचर्डसन यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. या सुनावणीत भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासह बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन आणि क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर सुमित मल्लापूरकर होते. या सुनावणीदरम्यान, सूर्यकुमार यादवला अधिकृतपणे इशारा देण्यात आला आणि त्यानंतर भारतीय कर्णधाराला दंड होऊ शकतो किंवा त्याच्यावर डिमेरिट पॉइंट्स दिले जाऊ शकतात.

अशा प्रकरणांमध्ये, एकतर इशारा दिला जातो, सामना शुल्कातून १५% कपात केली जाते किंवा एक डिमेरिट पॉइंट दिला जातो. त्यामुळे सूर्यकुमारवर सामना खेळण्याची बंदी घातली जाणार नाही. या प्रकरणाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे, परंतु असं मानलं जात आहे की सूर्याला इशारा देऊन सोडले जाऊ शकते. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

पाकिस्तानने सूर्यकुमार यादवच्या कोणत्या वक्तव्याबाबत आयसीसीकडे तक्रार केली?

भारताने गट टप्प्यातील सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आणि त्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या झालेल्यांच्या कुटुंबियांना आणि भारतीय लष्कराला समर्पित केला. भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासही नकार दिला. पाकिस्तानने हे खेळाच्या भावनेविरुद्ध असल्याचे वर्णन केले आणि सूर्यकुमारबद्दल आयसीसीकडे तक्रार केली.