Suryakumar Yadav Fined by ICC: भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांना मोठे धक्के बसले आहेत. आयसीसीकडे भारत आणि पाकिस्तान सामन्यांमधील वादाबाबत दोन्ही संघांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींनंतर आता आयसीसीने सुनावणीनंतर कारवाई केली आहे. हारिस रौफ आणि फरहाननंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादववर देखील आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे.

१४ ऑक्टोबरला गट टप्प्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना आणि भारतीय लष्कराला समर्पित केला होता. पण सूर्या या वक्तव्यामुळे दोषी आढळला आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला होता, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आप्तस्वकीय गमावलेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आजचा विजय भारतीय लष्कराला समर्पित करतो. त्यांनी अतुलनीय धैर्य दाखवलं. ते देशवासीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. आम्ही मैदानात दमदार कामगिरी करून त्यांना अभिवादन करतो..”

सूर्यकुमार यादवच्या दंडाविरोधात बीसीसीआयने काय घेतला निर्णय?

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने कर्णधाराला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केलं आहे. गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अधिकृत सुनावणीदरम्यान सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सूर्यकुमार यादवची निर्दोषता याचिका फेटाळून लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे तक्रार दाखल केल्यानंतर, भारतीय कर्णधारावर राजकीय स्वर असल्याच्या भाष्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर ही सुनावणी घेण्यात आली होती.

हारिस रौफवर आयसीसीची कारवाई

केवळ सूर्यकुमार यादवच नाही तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ देखील दोषी आढळला आहे. आयसीसीने त्याच्या सामन्याच्या फीच्या ३० टक्के दंड ठोठावला आहे. साहिबजादा फरहान देखील दोषी आढळला आहे, पण त्याला समज देऊन सोडण्यात आलं आहे. हरीस रौफने मैदानात ६-० आणि विमान क्रॅश झाल्याचे हावभाव केले, तर साहिबजादाने त्याच्या बॅटने बंदुकीचं सेलिब्रेशन करत अर्धशतक साजरे केले. हे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन मानले गेले आहे.

Live Updates