Asia Cup 2025 ICC Accepts Complaint Against Suryakumar Yadav: भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मोठ्या अडचणीत सापडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हणजेच पीसीबीने सूर्यकुमार यादवविरोधात आयसीसीकडे तक्रार केली आहे. भारतीय संघाने सुपर फोर टप्प्यातील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत आशिया चषकाच्या अंतिम सामन्याचं तिकिट मिळवलं आहे. यानंतर आता पीसीबीने भारतीय कर्णधाराची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. पण कशाबद्दल तक्रार केली आहे, जाणून घेऊया.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात गट टप्प्यात आणि सुपर फोरमध्ये मिळून आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले. दोन्ही वेळेस भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. पण दोन्ही सामन्यांदरम्यान मोठे वाद झालेले पाहायला मिळाले. भारतीय संघाने पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानच्या खेळाडूंनी दुसऱ्या सामन्यात विनाकारण भारतीय खेळाडूंशी वाद घातला आणि ऑपरेशन सिंदूरसंबंधित तणावत्मक परिस्थितीतील काही घटनांचे हातवारे केले.
सूर्यकुमार यादवविरोधात PCBने ICCकडे का केली तक्रार?
आशिया चषक २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने दिलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला मिरची लागली आहे. सूर्याच्या वक्तव्याविरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. सूर्यकुमार यादवच्या विरोधात केलेल्या या तक्रारीमुळे भारतीय संघ टेन्शनमध्ये आला आहे. आयसीसी कर्णधार सूर्यावर बंदी घालणार की त्याला दंड आकारला जाणार, नियम काय म्हणतात ते जाणून घेऊया.
दैनिक जागरणच्या अहवालानुसार, सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला एक ईमेल पाठवला. त्या ईमेलमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) सूर्यकुमार यादवच्या सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमधील वक्तव्यासंबंधित आणि पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांविषयी दोन अधिकृत अहवाल त्यांना मिळाले आहेत, याची त्यांनी नोंद घेतली आहे.
ईमेलच्या माहितीनुसार, रिचर्डसन यांनी नमूद केलं की पीसीबीने (PCB) सादर केलेले सर्व पुरावे आणि निवेदनं तपासल्यानंतर सूर्यकुमार यादवची वक्तव्यं खेळाच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरू शकतात असं आढळलं. त्यामुळे भारतीय कर्णधाराविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. सूर्यकुमार यादवने भारताचा पाकिस्तानविरूद्ध मिळवलेला विजय पहलगाम हल्ल्यातील मृत व्यक्तींच्या कुटुंबाला आणि भारतीय लष्काराला समर्पित केला.
रिचर्डसन यांनी पुढे स्पष्ट केलं की सूर्यकुमार यादवला हा आरोप मान्य करण्याची किंवा औपचारिक सुनावणीला सामोरं जाण्याचा पर्याय असेल. या सुनावणीत आयसीसीचे मॅच रिफरी, बीसीसीआय आणि पीसीबीचे प्रतिनिधी तसेच सूर्यकुमार स्वतः उपस्थित असतील.
सूर्यकुमार यादववर एका सामन्याची बंदी घातली जाणार?
आयसीसी कोड ऑफ कंडक्टनुसार, ही घटना बहुधा लेव्हल-१ गुन्हा मानली जाईल. लेव्हल-१ च्या उल्लंघनात खेळाडूंवर बंदी घालण्यात येत नाही, फक्त सामना शुल्काच्या काही टक्के दंड आकारला जातो. बंदी तेव्हाच लागू होते जेव्हा गुन्हा लेव्हल-२, ३ किंवा ४ चा असेल (जसे की शिवीगाळ, धमकी देणं, चेंडूबरोबर छेडछाड करणे). त्यामुळे सूर्यकुमार यादववर बंदी घालण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, पण दंड आकारला जाऊ शकतो.