Asia Cup 2025 IND vs PAK Suryakumar yadav on india win: भारताच्या आशिया चषक विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने रेव्हस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत बऱ्याच मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलला आहे. ‘आम्हाला सभ्यतेने आणि शिष्टाचाराचे संकेत पाळून खेळायचं होतं. खेळाच्या माध्यमातून उत्तर द्यायचं होतं. चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळायचं होतं. खेळात हारजीत होत राहते. तो भाग वेगळा पण आरशासमोर उभं राहिल्यावर तुम्हाला आनंदी वाटायला हवं’, असं भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने रेव्हस्पोर्ट्स ग्लोबलशी युट्यूब चॅनलशी बोलताना सांगितलं. क्रीडा पत्रकार बोरिया मुझुमदार यांनी पहाटे तीन वाजता सूर्यकुमारची मुलाखत घेतली. त्यावेळी सूर्याने भारत-पाकिस्तान लढतीचं दडपण, स्पर्धेचं आव्हान, प्रशिक्षक गंभीर यांचं योगदान यासंदर्भात माहिती दिली.
‘आम्ही आमचं सर्वोत्तम प्रदर्शन केलं आहे असं वाटायला हवं. फायनलची लढत दडपणाची होती. मी नाकारणार नाही. माझं हृदय धडधडत होतं. पण कोणीही खेळापेक्षा मोठा नाही. भावनांना बाजूला ठेवा आणि खेळावर लक्ष केंद्रित करा’, हाच सल्ला दिला.
‘गौतम गंभीर मला मोठ्या भावासारखे आहेत. आम्ही केकेआरसाठी एकत्र खेळलो. आम्ही दोघं एकमेकांना चांगलं ओळखतो. मी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो आहे. केकेआरसाठी खेळत असताना नेतृत्वासंदर्भात क्लृप्त्या त्यांच्याकडून शिकलो आहे. खेळाडूच्या मनात काय सुरू असतं हे त्यांना कळतं. मोठ्या स्पर्धेसाठी तयारी कशी करायची हे त्यांना माहिती आहे. स्वत:अनेक वर्ष भारतीय संघासाठी खेळल्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे. मी मैदानात खेळायला उतरतो, कर्णधारपद हाताळत असतो- तेव्हा माझं लक्ष डगआऊटमध्ये त्यांच्याकडे असतं. ते कोणतीही गोष्ट सुचवतात किंवा सांगतात त्यांचं म्हणणं ऐकतो. आमच्या दरम्यान हा विश्वासाचा बंध आहे’, असं सूर्याने सांगितलं.
“शिवम दुबे गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारेल हा गंभीर यांचा निर्णय होता. तो ही जबाबदारी स्वीकारेल असं त्यांनी मला सांगितलं. मला त्यांच्याप्रति पूर्ण विश्वास आहे त्यामुळे या विषयावर पुढे चर्चा झाली नाही. शिवमने त्यांचा आणि संघाचा विश्वास सार्थ ठरवला. सामना संपल्यानंतर दडपणाखाली होतो असं त्याने सांगितलं पण मैदानात त्याला खेळताना तसं वाटलं नाही. त्याने नवीन चेंडू आत्मविश्वासाने हाताळला.”
“कारकिर्दीतल्या सगळ्यात आव्हानात्मक स्पर्धांपैकी एक असं म्हणावं लागेल. एकामागोमाग एक सामने होते. वातावरण उष्ण आणि दमट होतं. त्यामुळे जेतेपदापर्यंतची वाटचाल सोपी नव्हती.”
“फलंदाज सामने जिंकून देतात. पण मी जेवढं पाहिलं आहे, रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळलो आहे. तेव्हाही मला हेच जाणवलं आहे की, गोलंदाज आपल्याला स्पर्धा जिंकून देतात. सर्वांनी आपल्या डॉमेस्टिक संघासाठी, फ्रँचायझीमध्ये आणि भारतासाठी अशा दबावाच्या स्थितीत सामने खेळले आहेत. त्यामुळे सामना आपल्या बाजूने कसा खेचायचा हे माहितीये, त्यामुळे चांगली गोलंदाजी, एनर्जी, बॉडी लँग्वेज आणि शांत राहणं. दबावाच्या स्थितीत आपण जितकं शांत राहतो, तितकंच तुम्ही खुलून कामगिरी करू शकता. त्यानंतर गोलंदाजांनी जी षटकं टाकली आणि सामन्याचा रोख बदलला. हा फलंदाजीत थोडी गडबड झाली, पण अखेरीस तो अंतिम सामना होता.”
“विजयानंतर आम्ही एकत्र आलो बसलो, स्पर्धेबद्दल चर्चा केली. मी सर्वांना म्हणालो, मैदानावर माझ्याशी जुळवून घेतल्याबद्दल मी सगळ्यांना थँक्यू बोलतो. कारण मैदानावर असताना जे खरं आहे तेच बोलावं लागतं, मग समोरच्याला आवडेल नाही आवडेल. एखादा खेळाडू माझ्याशी दोन दिवस बोलला नाही तरी चालेल. पण तिसऱ्या दिवशी त्याला कळेल की मी त्याच्या चांगल्यासाठी बोललो आहे. मी त्यांना सांगितलं आहे. तुम्हाला जे बोलायचं आहे मला, ते बिनधास्त येऊन सांगा. मनात ठेवू नका किंवा इतरांशी कुजबूज करू नका. हे असं संघाचं वातावरण नसतं. मैदानाबाहेर जे सच्चे मित्र असतात. ते मैदानावर गेल्यावर कमालीची कामगिरी करतात.”