Asia Cup 2025 What Happens in Presentation Ceremony: आशिया चषक २०२५ चा विजेता भारतीय संघ जेतेपद आपल्या नावे केल्यानंतर मायदेशी परतला आहे. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत विक्रमी नवव्यांदा या स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावे केलं. पण जेतेपद पटकावल्यानंतर मात्र भारतीय संघ आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यावरून मोठी चर्चा सुरू आहे, पण सूर्यकुमार यादवने नेमकं मैदानावर काय घडलं, हे सांगितलं आहे.
भारताच्या आशिया चषक विजयानंतर तब्बल सव्वा तास उशिरा प्रेझेंटेशन सेरेमनी सुरू झाली. सूर्यकुमार यादवनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जवळजवळ एक तास वाट पाहिली. शेवटी, टीम इंडियाने ट्रॉफीशिवाय आनंद साजरा केला. नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत.
सूर्यकुमार म्हणाला, “आम्ही दार बंद करून ड्रेसिंग रूममध्ये गेलो नाही. सादरीकरण समारंभासाठी आम्ही कोणालाही वाट पाहायला लावली नाही. तेच ट्रॉफी घेऊन पळून गेले. मी हेच पाहिलं. काही लोक आमचे व्हिडिओ काढत होते, पण आम्ही तिथेच उभे होतो. आम्ही आत गेलो नाही.”
बीसीसीआय किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून भारतीय संघाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याची चर्चा होी, परंतु भारतीय कर्णधाराने असे वृत्त फेटाळून लावलं आणि म्हटलं की हा मैदानावर घेतलेला संघाचा निर्णय आहे.
आशिया चषकाच्या प्रेझेंटेशन सेरेमनी नेमकं काय घडलं?
सूर्यकुमार म्हणाला, “सगळ्यात आधी तर मी हे स्पष्ट करतो की संपूर्ण स्पर्धेत, सरकार किंवा बीसीसीआयकडून कोणीही आम्हाला काही सांगितलं नाही की कोणाकडून ट्रॉफी स्वीकारायची किंवा नाही स्वीकारायची. आम्ही हा निर्णय स्वतः मैदानावर घेतला. ते (एसीसी अधिकारी) स्टेजवर उभे होते आणि आम्ही खाली उभे होतो. मी त्यांना स्टेजवर बोलताना पाहिलं आणि ते कशाबद्दल बोलत होते हे मला माहित नाही. काही चाहत्यांनी त्यांची हुर्याे उडवण्यासही सुरूवात केली. त्यानंतर आम्ही पाहिलं की प्रतिनिधी ट्रॉफी घेऊन पळून गेले.”
सूर्यकुमार म्हणाला, सामना संपल्यानंतर भारताचे खेळाडू त्यांचे फोन घेण्यासाठीही ड्रेसिंग रूममध्ये गेले नाहीत. संघाचे सपोर्ट स्टाफ त्यांचे फोन मैदानात घेऊन आले. “मैदानावरील प्रत्येकजण त्या क्षणाचा आनंद घेत होता. अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांना पुरस्कार मिळाल्यावर संपूर्ण संघाने आनंद साजरा केला. सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्यासाठी शिट्ट्या वाजवल्या. ही आमची संघ संस्कृती आहे.”
तासाभराने प्रेझेंटेशन सेरेमनी सुरू झाल्यानंतर पाकिस्तानला उपविजेता संघ म्हणून मेडल्स आणि बक्षीसाची रक्कम देण्यात आली. तर स्पर्धेतील काही वैयक्तिक पुरस्कार देण्यात आले. पण त्यानंतर सूत्रसंचालन करत असलेल्या सायमन डुलने भारतीय संघ आज आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचे जाहीर केलं.