Suryakumar Yadav Statement on Refusing Asia Cup 2025 Trophy: भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्ध आशिया चषकात विजयाची हॅटट्रिक लगावत जेतेपदही आपल्या नावे केलं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तान संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणं नाकारलं, यानंतर ट्रॉफीबरोबर फोटोशूटही नाकारलं. पण यापेक्षाही महत्त्वाचं भारताच्या आशिया चषक विजयानंतर टीम इंडियाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यावरून मोठी चर्चा सुरू आहे, दरम्यान कर्णधार सूर्यकुमारने यावर वक्तव्य केलं आहे.

भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून आशिया चषक ट्रॉफी आणि पदकं स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन स्टेडियममधून निघून गेले. याप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबी अध्यक्षांना आरसा दाखवत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून आशिया चषक २०२५ ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियाने नकार दिल्याच्या मुद्द्यावर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एएनआयशी संवाद साधला. सूर्यकुमार यादव म्हणाला, “मी या प्रकरणाला वाद म्हणणार नाही. जर पाहिलं असेल तर लोकांनी ट्रॉफीचे फोटो पोस्ट केले आहेत, पण खरी ट्रॉफी तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही लोकांची मनं जिंकता. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने दाखवलेला विश्वास हीच खरी ट्रॉफी आहे. पडद्यामागे काम करणारे लोकचं खरे ट्रॉफी आहेत. खरी ट्रॉफी म्हणजे मैदानावरील इतक्या लोकांची मेहनत असते. ही जी ट्रॉफी मिळणार आहे ते फक्त सन्मानचिन्ह आहे.”

तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही एकही सामना न गमावता स्पर्धा जिंकता तेव्हा हा अनुभव खूप कमाल असतो. संपूर्ण संघासाठी, संपूर्ण देशासाठी ही एक चांगली गोष्ट आहे. रात्री सर्व खेळाडू एकत्र आले, आम्ही बसून गप्पा मारल्या आणि खूप मजा केली.”

सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण संघाने ट्रॉफी न स्वीकारताही विजयाचं सेलिब्रेशन केलं. दुबईच्या मैदानावर सामन्यानंतर चॅम्पियन्स लिहिलेल्या बोर्डाच्या इथे फोटोशूट केलं. इतकंच नव्हे तर सूर्यकुमार यादवने रोहित शर्मा स्टाईलमध्ये प्रतिकात्मक ट्रॉफी हातात असल्यासारखं सेलिब्रेशन केलं. ज्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय भारताच्या सर्व खेळाडूंनी विविध फोटो आपल्या अकाऊंटवर शेअर केले आहेत.