दुबई : दिवाळीचा प्रकाशमय सण काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच दुबईत भारतीय संघाच्या क्रिकेटमधील वर्चस्वाचे दिवाळे निघाले. एकापेक्षा एक रत्नांचा समावेश असलेल्या भारतीय फलंदाजांच्या फळीची भंबेरी उडाली. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर आठ गडी आणि ३३ चेंडू राखून आरामात विजय मिळवला.
भारताने दिलेले १११ धावांचे माफक लक्ष्य न्यूझीलंडने १४.३ षटकांत गाठले. सलामीच्या लढतीत पाकिस्तानपुढे लोटांगण घालणाऱ्या भारतीय संघाचे सलग दुसऱ्या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. सध्या ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी असून न्यूझीलंडने मात्र पहिल्या विजयासह तिसरे स्थान पटकावले.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने या लढतीसाठी संघात दोन बदल करताना सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार यांच्या जागी अनुक्रमे इशान किशन, शार्दूल ठाकूर यांना संधी दिली. परंतु अनुभवी रोहित शर्माच्या जागी किशनला सलामीला पाठवण्याचा डाव भारताच्या अंगलट आला.
ट्रेंट बोल्टने किशनला (८ चेंडूंत ४ धावा), तर टिम साऊदीने के. एल. राहुलला (१६ चेंडूंत १८) पॉवरप्लेच्या षटकांतच माघारी पाठवून भारतावर दडपण टाकले. मग लेगस्पिनर सोधीने तिसऱ्या क्रमांकावर आलेला रोहित (१४ चेंडूंत १४) आणि कर्णधार विराट कोहली (१७ चेंडूंत ९) हे दोन महत्त्वाचे बळी मिळवून भारताच्या डावाला खिंडार पाडले. हार्दिक पंडय़ा (२४ चेंडूंत २३) आणि ऋषभ पंत (१९ चेंडूंत १२) यांनाही धावगतीचा वेग वाढवता आला नाही. अखेरच्या षटकांत रवींद्र जडेजाने १९ चेंडूंत नाबाद २६ धावा फटकावल्याने भारताने किमान तीन आकडी धावसंख्या गाठली.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने देहबोली खालावलेल्या भारतीय संघावर सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिले. जसप्रीत बुमराने मार्टिन गप्टिलला (२०) बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. मात्र डॅरेल मिचेल (४९) आणि विल्यम्सन (नाबाद ३३) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ७२ धावांची भर घालून भारताच्या आशांना सुरुंग लावला. बुमरानेच मिचेलला बाद केल्यावर विल्यम्सनने डेव्हॉन कॉन्वेच्या (२) साथीने न्यूझीलंडचा विजय साकारला.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ७ बाद ११० (रवींद्र जडेजा नाबाद २६; ट्रेंट बोल्ट ३/२०, इश सोधी २/१७) पराभूत वि. न्यूझीलंड : १४.३ षटकांत २ बाद १११ (डॅरेल मिचेल ४९, केन विल्यम्सन नाबाद ३३; जसप्रीत बुमरा २/१९) ल्ल सामनावीर : इश सोधी
३ ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारताची न्यूझीलंडविरुद्धची पराभवाची मालिका अद्यापही कायम आहे. भारताने अनुक्रमे २००७, २०१६, २०२१च्या विश्वचषकात पराभव पत्करला.
१८ गेल्या १८ वर्षांत भारताने न्यूझीलंडविरुद्ध ‘आयसीसी’ स्पर्धेतील एकही सामना जिंकलेला नाही. २००३च्या विश्वचषकात भारताने त्यांना अखेरचे नमवले होते.
आम्ही तिन्ही आघाडय़ांवर अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. गोलंदाजांचा विचार करता आमच्याकडे बचाव करण्यासारखे काही नव्हतेच. खेळपट्टीवर उतरण्यापूर्वीच आमची देहबोली खालावलेली होती. स्पर्धेतील पुढील वाट बिकट असली, तरी आम्ही आशा सोडलेली नाही. संघबांधणी करण्यासह आखलेल्या रणनीतींची योग्य अंमजबजावणी केल्यास आम्ही नक्कीच विजयपथावर परतू.
– विराट कोहली