भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर टीका केली आहे. नेदरलँडविरोधातील सामन्यात बाबर आझम लवकर बाद झाल्याने गौतम गंभीरने सुनावलं असून फलंदाजी क्रमात कोणताही बदल न केल्याने स्वार्थी म्हटलं आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर रविवारी पाकिस्तानची नेदरलँडविरोधात लढत होती. उपांत्यफेरीत आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणं गरजेचं होतं. पण या सामन्यातही बाबर आझम चांगली खेळी करु शकला नाही.

पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करताना नेदरलँडला ९१ धावांवर रोखलं होतं. या सामन्यात बाबर आझम लवकर बाग झाला. यानंतर रिझवान फखरने संघाला विजयाच्या जवळ नेलं. रिझवानने ४९ धावा केल्या तर फखरने २० धावा केल्या. पाकिस्तानने हा सामना जिंकला असला तरी पुन्हा एकदा बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गौतम गंभीरने बाबर आझमवर टीका केली असून, त्याने आधी संघाचा विचार केला पाहिजे असं म्हटलं आहे. बाबरने आपल्याआधी फखरला मैदानात पाठवायला हवं होतं असं मत गंभीरने मांडलं आहे.

T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू उपलब्ध असणार नाही

तुम्ही संघाचे कर्णधार असताना स्वार्थी होणं सोपं असतं असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. “तुम्ही आपल्याआधी संघाचा विचार केला पाहिजे. जर तुम्ही ठरवल्याप्रमाणे गोष्टी होत नसतील तर फखरला आधी फलंदाजीसाठी पाठवायला हवं होतं. हा स्वार्थीपणा आहे. तुम्ही कर्णधार असताना स्वार्थी होणं सोपं असतं. बाबर आणि रिझवानासाठी आघाडीला फलंदाजी करत अनेक रेकॉर्ड करणं शक्य आहे. पण तुम्ही नेतृत्व करत असताना आधी संघाचा विचार केला पाहिजे,” असं गौतम गंभीरने समालोचन करताना म्हटलं.

पाकिस्तान संघ गुरुवारी दक्षिण अफ्रिकेशी भिडणार आहे. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केल्यास उपांत्यफेरीत पोहोचण्याच्या आशा कायम राहतील.