टीम इंडियाची युवा धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिने जागतिक टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ICC ने महिला टी २० क्रिकेटपटूंची ताजी यादी जाहीर केली. यात शफाली तब्बल १९ स्थानांची झेप घेत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. तिने न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुझी बेट्स हिला मागे टाकले. सुझी बेट्स हिची एका स्थानाने घसरण होऊन ती दुसऱ्या स्थानी घसरली आहे. सुझीचे ७५० गुणांक आहेत, तर शफाली ७६१ गुणांकासह अव्वल आहे. ऑक्टोबर २०१८ पासून सुझी अव्वल स्थानी होती. अखेर १७ महिन्यांनी तिला दुसऱ्या स्थानी ढकलत शफालीने अव्वल स्थान पटकावले.

भारताकडून शफालीचा धमाका

टी २० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला होता. त्यात शफालीचे महत्त्वाचे योगदान होते. प्रत्येक सामन्यात शफालीने धडाकेबाज कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. शफालीने पहिल्या सामन्यात २९, दुसऱ्या सामन्यात ३९, तिसऱ्या सामन्यात ४६ तर चौथ्या सामन्यात ४७ धावा केल्या. यात दोन सामन्यांमध्ये तिने सामनावीराचा किताब पटकावला. त्यामुळे टी २० विश्वचषक स्पर्धेत सध्या ती १६१ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

दमदार कामगिरीच्या बळावर शफालीचा विक्रम

शफालीने भारताला दमदार कामगिरी करून देत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. यासह महिला आणि पुरूष अशा दोन्ही क्रिकेटमध्ये मिळून टी २० जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी शफाली सर्वात तरूण भारतीय क्रिकेटपटू ठरली. याशिवाय भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्यानंतर टी २० क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली.

शफालीचा टी २० क्रिकेटमधील प्रवास

रोहतकची शफाली हिने अवघ्या सहा महिन्यात टी २० क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले. सप्टेंबर २०१९ मध्ये तिने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरत येथून आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केली. आतापर्यंत शफालीने १८ टी २० सामन्यात २८ च्या सरासरीने ४८५ धावा केल्या आहेत. तिने १४६.९६ च्या स्ट्राईक रेटने खेळताना २ अर्धशतके झळकावली आहेत.