ऑस्ट्रेलियासोबत तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय संघाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. संपूर्ण भारतीय संघाचा करोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील रेस्तराँमध्ये करोनासंबंधित नियमांचं उल्लंघन करताना दिसल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यामुळे भारतीय संघाला करोना संकटाचा सामना करावा लागतो का काय? अशी शंका निर्माण झाली होती.
“३ जानेवारीला भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची करोना चाचणी करण्यात आली. सर्व चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे,” अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.
पाच खेळाडूंसह संपूर्ण भारतीय संघ आज सिडनीत
एकीकडे खेळाडूंनी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ऑस्ट्रेलियामधील मीडिया लक्ष्य करत असताना भारतीय संघाने मात्र संपूर्ण लक्ष सिडनीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याकडे केंद्रीत केलं होतं. ७ जानेवारीपासून सिडनीमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
Biggest positive from Melbourne: Indian players test negative for coronavirus
Read @ANI Story | https://t.co/B6RfnazOUf pic.twitter.com/hD2JWUnnAB— ANI Digital (@ani_digital) January 4, 2021
एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या भारतीय संघासाठी चिंतेची बाब नसून तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीमध्ये कोणतीही उणीव ठेवली जात नाही आहे. सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ प्रत्येकी एक सामना जिंकत बरोबरीत आहेत.
रोहित, पंत, शुबमनचं बिल भरणाऱ्या चाहत्याला द्यावं लागलं स्पष्टीकरण
“भारतीय खेळाडूंनी मैदानाबाहेर बाहेर कोण काय बोलत आहे याकडे लक्ष देणं टाळलं आहे. कोणताही नियम तोडला नाही यावर आम्ही ठाम आहोत. सध्या आम्ही तिसऱ्या सामन्यावर लक्ष्य केंद्रीत करत आहोत. २-१ ने आघाडी घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,” अशी माहिती सूत्राने दिली.
काय वाद झाला होता?
करोनासंबंधित नियमांचा भंग केल्याचा आरोप रोहित, सलामीवीर शुभमन गिल, यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि फलंदाज पृथ्वी शॉ यांच्यावर आहे. या प्रकरणी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून चौकशी चालू असली तरी पाच खेळाडूंना संघासोबत प्रवासाला मनाई करण्यात आलेली नाही. नवदीप सिंग या चाहत्याने ‘ट्विटर’वर भारतीय संघातील पाच खेळाडूंसोबतची चित्रफित टाकल्यानंतर शनिवारी हा वाद निर्माण झाला. त्यानंतर ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) साथीने संयुक्त चौकशी करीत असल्याचं घोषित केलं.
नवदीपने खेळाडूंच्या भोजनाचे पैसेही भरल्याचा दावा करत त्यासंबंधीची पावती ‘ट्विटर’वर टाकली. याचप्रमाणे पंतने निघताना आपल्याला आलिंगन दिल्याचेही त्याने म्हटलं आहे. या व्यक्तीने परवानगी न घेताच ही चित्रफित आणि पावती समाजमाध्यमांवर टाकल्याने हा वाद निर्माण झाला.