तेजस्वी काटे हिने आपलीच सहकारी सालसा अहेर हिच्यावर ६-१, १-६, ६-२ अशी मात करीत १४ वर्षांखालील गटाच्या आशियाई मानांकन टेनिस स्पर्धेतील मुलींच्या गटात विजयी प्रारंभ केला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत तेजस्वी हिने संघर्षपूर्ण खेळ करीत विजयश्री खेचून आणली. अग्रमानांकित विपाशा मेहरा हिने अव्यक्ता थोरात हिच्यावर ६-२, ६-१ असा सफाईदार विजय मिळविला. तिने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला.
अव्यक्ताची बहीण अनया हिने मात्र विजयी प्रारंभ केला. तिने शरयू गरुड हिचा ६-३, ६-२ असा पराभव केला. ईश्वरी माथेरे हिने यार्लागद्दा खुशी हिचे आव्हान ६-०, ६-० असे संपुष्टात आणले. एकतर्फी झालेल्या लढतीत तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांबरोबरच बिनतोड सव्‍‌र्हिसचाही सहज उपयोग केला. पानया भल्ला हिने अपराजित्व राखताना नेहा मोकाशी हिच्यावर २-६, ६-३, ६-३ अशी मात केली. मुलांच्या गटात अग्रमानांकित हेमान नामा याने चतुरस्र खेळ करीत त्रिभुवन रेड्डी याला ६-४, १-६, ७-६ (७-५) असे हरविले. तामिळनाडूच्या वरुण वैको याने आठव्या मानांकित कॅली कमिन्सवर ६-१, ६-२ असा अनपेक्षित विजय नोंदविला.