Sahibzada Farhan Celebration: आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला ३ वेळा लोळवून जेतेपदाचा मान पटकावला होता. सुपर ४ फेरीत जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी सामन्यादरम्यान बरंच काही घडलं होतं. या सामन्यात साहिबजादा फरहानने केलेलं सेलिब्रेशन तुफान चर्चेत राहिलं होतं. या सेलिब्रेशनमुळे आयसीसीने त्याच्यावर कारवाई देखील केली होती. पण अजूनही त्याला अद्दल घडलेली नाही. आता पुन्हा एकदा तो आपल्या वादग्रस्त सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घ्या.

सुपर ४ फेरीत भारताविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने ‘एके ४७’ सेलिब्रेशन केलं होतं. त्या सेलिब्रेशनमुळे पाकिस्तानात त्याची क्रेझ वाढली आहे, असं त्याचं म्हणणं आहे. दरम्यान आता एका प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी तो ‘एके ४७’ सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे.

या जाहिरातीसाठी सेलिब्रेशन करण्याआधी त्याने आपल्या बॅटवर ‘एके ४७’ सेलिब्रेशन करत असल्याचं स्टिकर असल्याचा फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याने या प्रॉडक्टचं प्रमोशन करताना पुन्हा एकदा हे सेलिब्रेशन केलं. दरम्यान या सेलिब्रेशनमुळे भारतात त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

साहिबजादा फरहानने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली होती. त्याने पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना ४० धावा केल्या होत्या. त्यानंतर सुपर ४ फेरीतील सामन्यादरम्यान ५८ आणि अंतिम सामन्यात फलंदाजी करताना ५७ धावांची खेळी केली होती.

सुपर ४ फेरीतील सामन्यात पाकिस्तानचा एकतर्फी पराभव झाला. पण याच सामन्यात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने केलेलं सेलिब्रेशन तुफान चर्चेत राहिलं. या वादग्रस्त सेलिब्रेशननंतर बीसीसीआयने त्याच्यावर कारवाईची मागणी देखील केली होती. याची दखल घेत आयसीसीकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.