Airplane video of England vs Australia match goes viral: ॲशेस मालिकेअंतर्गत हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, चाहतेही याचा भरपूर आनंद घेत आहेत. अशात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामना सुरु असताना आकाशात एक विमान बॅनरसह घेऊन स्टेडियमवरून जाताना पाहून लोकांना धक्का बसला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक विमान आणि त्याच्या खाली एक बॅनर ओढत घेऊन जाताना दिसत आहे. हेडिंग्लेमध्ये बसलेल्या एका चाहत्याने मोबाईलवरून हा व्हिडीओ शूट केला आहे. चाहत्याने झूम करून बॅनर वाचण्याचा प्रयत्न करताच त्यावर ‘सेम ओल्ड ऑसी, टेलर स्पोर्ट्स बार’ असे लिहिले होते.
ऑस्ट्रेलियन संघाला डिवचले –
टेलर स्पोर्ट्स बार हेडिंग्ले येथे स्थित रेस्टॉरंट आणि बार आहे. या रेस्टॉरंट आणि बारचे मालक अँडी टेलर यांनी इंग्लिश मैदानाच्या आसपास ऐकलेल्या घोषणांनी इंग्लंडला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी हा खास बॅनर बनवला आहे.
तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी हेडिंग्लेवर हा बॅनर फडकावून त्याने ऑस्ट्रेलियन संघाला डिवचले. खरंच, घरच्या चाहत्यांनी खचाखच भरलेल्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये “तेच जुने ऑसीज, नेहमी फसवणूक” अशा घोषणा ऐकू आल्या. लॉर्ड्सवर जॉनी बेअरस्टोची विकेट पडल्यानंतर या घोषणांचा आवाज अचानक वाढला. या घटनेनंतर हे भांडण लॉर्ड्सच्या प्रसिद्ध लाँग रूमपर्यंत पोहोचले. यानंतर एमसीसीच्या तीन सदस्यांना निलंबित करण्यात आले होते.
इंग्लंडला बसला सर्वात मोठा धक्का –
मिचेल स्टार्कने इंग्लंड संघाला सर्वात मोठा धक्का दिला. त्याने इंग्लंडचा इनफॉर्म बॅट्समन आणि कर्णधार बेन स्टोक्सला बाद केले. स्टोक्सने १५ चेंडूत १३ धावा करत यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीकडे झेल सोपवला.
स्टार्कला चौथे यश मिळाले –
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हेडिंग्ले येथे धारदार गोलंदाजी करत आहे. बेन स्टोक्सनंतर त्याने जॉनी बेअरस्टोला बाद करून इंग्लंडला सहावा धक्का दिला आहे. आठ चेंडूत पाच धावा केल्यानंतर बेअरस्टो क्लीन बोल्ड झाला. इंग्लंडने सहा गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक आणि ख्रिस वोक्स क्रीजवर आहेत. इंग्लंडला विजयासाठी आणखी ७९ धावा करायच्या आहेत.