Kanga League Rules: मुंबई क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडूंचा वारसा लाभला आहे. सचिन तेंडुलकर,सुनील गावसकर आणि रवी शास्त्रींसारखे दिग्गज खेळाडू याच मातीत घडले. मुंबईकडून क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. पण मुंबईच्या संघात स्थान मिळवणं इतकं सोपं नसतं. मुंबईत अनेक ऐतिहासिक मैदानं आहेत. सकाळी ६ पासून क्रिकेट सुरू होतं, ते अगदी रात्रीपर्यंत सुरू राहतं. आझाद मैदानावर एकाच वेळी अनेक सामने सुरू असतात. मुंबईतील लाखो खेळाडू एकच स्वप्नं पाहतात, ते म्हणजे मुंबईचं प्रतिनिधित्व करणं. पण ही संधी केवळ ११ खेळाडूंनाच मिळते.
आता हे ११ खेळाडू कसे घडतात? तर वर्षभर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवून. तसं इतर राज्यांमध्ये क्रिकेट हे ८ महिने सुरू राहतं. ४ महिने पावसामुळे खेळाडूंना विश्रांती मिळते. पण मुंबईतील खेळाडू पावसातही क्रिकेट खेळण्यासाठी तयार असतात. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून कांगा लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. मुंबईत पावसामुळे वाहतूक थांबते,पण क्रिकेट मुळीच थांबत नाही. मैदानावर हिरवेगार गवत, चिखल आणि ढगाळ वातावरण असतानाही कांगा लीग स्पर्धा मात्र सुरू राहते. अशा परिस्थितीत १ तास खेळपट्टीवर टिकून राहणं म्हणजे,इतरवेळी ४ ते ५ तास फलंदाजी करण्यासारखं आहे. त्यामुळे मुंबईतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खडूस असं म्हटलं जातं. दरम्यान काय आहेत कांगा लीग क्रिकेट स्पर्धेचे नियम? जाणून घ्या.
या स्पर्धेचं नाव डॉ. एचडी कांगा यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केली जाते. एचडीकांगा मेमोरियल क्रिकेट लीग स्पर्धेत ९८ हून अधिक संघांना प्रवेश दिला जातो. हे क्लब्स किंवा जिमखाना हे अ,ब,क,ड, इ, फ आणि ग अशा ७ विभागात विभागले जातात. प्रत्येक विभागात १४ संघांना स्थान दिलं जातं. अ ते ग या ७ विभागांमध्ये एकूण प्रत्येकी१४- १४ संघ असतात. स्पर्धेच्या शेवटी ग विभागातील तळाशी असलेल्या ४ संघांची जागा ही कांगा लीग नॉकआऊट स्पर्धेत वरच्या स्थानावर असलेल्या ४ संघांनी घेतली जाईल.
पात्रता काय?
जे खेळाडू मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये नोंदणीकृत आहेत,केवळ अशाच खेळाडूंना ही स्पर्धा खेळण्याची अनुमती दिली जाते. जर एखाद्या खेळाडू किंवा क्लबने नियमांचं उल्लंघन केलेलं असेल, तर त्या क्लबवर कारवाई केली जाते. असं करणाऱ्या क्लब किंवा खेळाडूवरही शिस्थभंगाची कारवाई केली जाईल. तर लीग स्पर्धेतील शेवटी त्या क्लबचा आपल्या दर्जापेक्षा कमी असलेल्या विभागात समावेश केला जाईल. यासह नोंदणीकृत नसलेल्या खेळाडूशिवाय उर्वरीत सामने पूर्ण करावे लागतील.
गुणपद्धती कशी असते ?
कांगा लीग स्पर्धेतील सामने हे रविवारी आयोजित केले जातात. हे सामने एकाचवेळी वेगवेगळ्या मैदानांवर आयोजित केले जातात. या स्पर्धेची गुणपद्धती थोडक्यात समजून घ्या.
सामना जिंकणारा संघ- ८ गुण
पहिल्या डावात आघाडीवर असलेला संघ आणि दोन्ही डाव पूर्ण झालेले नाहीत- ५ गुण
पहिल्या डावात संघाचा पराभव आणि दोन्ही डाव पूर्ण झालेले नाहीत- ३ गुण
दोन्ही संघांनी दोन डाव पूर्ण केलेले असतील – प्रत्येकी ४ गुण
पहिल्या डावात बरोबरी आणि सामन्या निकाल लागला नाही- प्रत्येकी ३-३ गुण
पहिल्या डावाचा निकाल न लागल्या अनिर्णित सामना, किमान २ तास खेळ झाला असावा – प्रत्येकी ३ गुण
एकही चेंडू न टाकता सामना रद्द- प्रत्येकी २ गुण
थेट पराभवासाठी -शून्य गुण