Virender Sehwag On Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काह शिल्लक राहिले आहेत. ९ सप्टेंबरपासून युएईत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. दरम्यान या स्पर्धेला सुरूवात होण्याआधी अनेक दिग्गज खेळाडूंनी भविष्यवाणी करायला सुरूवात केली आहे. काही खेळाडूंनी स्पर्धेत कोणता संघ जेतेपदाचा मान पटकावणार याबाबत भविष्यवाणी केली आहे. तर माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय संघातील कोणते खेळाडू आशिया चषकात गेमचेंजर ठरू शकतात, याबाबत भविष्यवाणी केली आहे.

वीरेंद्र सेहवागने सोनी स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत भारतीय संघातील ३ खेळाडूंची नावं सांगितली आहेत, जे आगामी आशिया चषकात गेमचेंजर ठरू शकतात. कोण आहेत ते ३ खेळाडू? जाणून घ्या.

सेहवाग म्हणाला, “मला वाटतं अभिषेक शर्मा आशिया चषकात भारतीय संघासाठी गेमचेंजर ठरू शकतो. बुमराह आधीपासूनच भारतीय संघासाठी गेमचेंजर आहे. यासह वरूण चक्रवर्तीने देखील आपल्या मिस्ट्री गोलंदाजीच्या बळावर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-२० फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी केली. माझ्या मते,हेच खेळाडू आहेत जे भारतीय संघासाठी गेमचेंजर ठरू शकतात.”

वीरेंद्र सेहवागने बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबतही आपलं मत मांडलं. काही दिवसांपूर्वी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली, त्यावेळी आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं की, बुमराह या मालिकेतील ३ सामने खेळणार. त्यामुळे तो या मालिकेतील ३ सामने खेळताना दिसून आला होता. तर २ सामन्यांमध्ये त्याला विश्रांती देण्यात आली होती.

बुमराहच्या वर्कलोडबाबत बोलताना सेहवाग म्हणाला की, “मला वाटतं, वर्कलोड खूप महत्वाचा आहे. मुख्यत: गोलंदाजांसाठी. फलंदाजांसाठी वर्कलोड फार महत्वाचा नाही. कारण ते खेळू शकतात. त्यामुळे मला वाटतं की वर्कलोड गोलंदाजांसाठी अतिशय महत्वाचा आहे.” जसप्रीत बुमराहचा आशिया चषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची धुरा बुमराहच्या हाती असणार आहे. त्याला अर्शदीप सिंगची साथ मिळू शकते. यासह हर्षित राणाचा देखील भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.