भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून लीड्सच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहे. भारतीय संघाचा सराव सामना भारतीय अ संघाविरूद्ध सुरू आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम केल्यामुळे भारतीय कसोटी संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ हंगामातील पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवन गोलंदाज डेल स्टेनने मालिकेतील विजेत्या संघाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

डेल स्टेनची मोठी भविष्यवाणी

डेल स्टेनने जिओ हॉटस्टारवर बोलताना म्हटले की, “सर्व सामने अटीतटीचे होतील, पण सामन्याचा निकाल लागेल. मला वाटतं, इंग्लंड या मालिकेत ३-२ ने बाजी मारेल. प्रत्येत कसोटी सामन्याचा निकाल लागेल. कुठलाही संघ सहज विजय मिळवू शकणार नाही.” स्टेनच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडचा संघ भारतीय संघाला पराभूत करून मालिका आपल्या नावावर करेल.

भारतीय संघासाठी आगामी दौरा मुळीच सोपा नसणार आहे. कारण या मालिकेआधीच रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दौऱ्यावर अनुभवी खेळाडूंची कमतरता जाणवू शकते. भारतीय संघात स्थान मिळालेले बरेचशे खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यावर खेळणार आहेत. गिलकडेही कसोटी क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. त्यामुळे गिलची चांगलीच कसोटी लागणार आहे.

घरच्या मैदानावर खेळताना इंग्लंडचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. मुख्य प्रशिक्षक ब्रेँडन मॅक्यूलमच्या नेतृत्वाखाली खेळताना इंग्लंडने आतापर्यंत मायदेशात २० सामने खेळले आहेत. यापैकी १५ सामन्यांमध्य इंग्लंडने विजयाची नोंद केली आहे. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान एक सामना ड्रॉ राहिला आहे. इंग्लंडचा मायदेशातील रेकॉर्ड हा भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारा आहे. त्यामुळे युवा भारतीय संघ कशी कामगिरी करणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.