बेनफिकाने टॉटनहॅम हॉट्सपरचा तर ज्युवेंट्सने फिरोंटिनाचा पराभव करून युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. टॉटनहॅमने दोन मिनिटांत दोन गोल करून बेनफिकासमोर आव्हान निर्माण केले होते. पण बेनफिकाने ही लढत २-२ अशी बरोबरीत सोडवून पहिल्या टप्प्यातील ३-१ अशा विजयाच्या आधारे अंतिम आठ जणांत स्थान मिळवले. ज्युवेंट्सने १-० असा विजय मिळवत आगेकूच केली.
ज्युवेंट्स-फिरोंटिना यांच्यातील पहिला सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यामुळे फिरोंटिनाला अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवण्याचे वेध लागले होते. मात्र आंद्रिया पिलरे याने ७१व्या मिनिटाला फ्री-किकवर झळकावलेला गोल ज्युवेंट्सला उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवून गेला.
इझेक्वायल गाराय याने ३४व्या मिनिटाला गोल करून बेनफिकाला आघाडीवर आणले. पण नेसर चाडली याने ७८व्या आणि ७९व्या मिनिटाला गोल करून टॉटनहॅमच्या आशा उंचावल्या. अखेर रॉड्रिगो लिमाने ९०व्या मिनिटाला बेनफिकाला बरोबरी साधून दिली. पहिल्या टप्प्यातील ३-१ हा विजय बेनफिकासाठी आगेकूच करण्यासाठी पुरेसा ठरला.