R Ashwin Batting, TNPL 2025: तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील शेवटच्या टप्प्यातील सामन्यांना सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना दिंडीगुल ड्रॅगन्स आणि ट्रिची ग्रँड चोलस या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात भारताचा माजी खेळाडू आर अश्विन चमकला. अश्विनने फलंदाजी आणि गोलंदाजीत दमदार कामगिरी केली. अश्विनने तुफान फटकेबाजी करत आपल्या संघाला क्वालिफायर २ मध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात ट्रिची ग्रँड चोलस संघाला २० षटकांअखेर अवघ्या १४० धावा करता आल्या. यादरम्यान दिंडीगुल ड्रॅगन्स संघाकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने ४ षटकात २८ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.

गोलंदाजीत आपला दम दाखवल्यानंतर त्याने फलंदाजीला येऊन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आर अश्विन दिंडीगुल ड्रॅगन्स संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी येतो. या सामन्यात त्याने अशी खेळी केली की, दिंडीगुल ड्रॅगन्स संघाने हा सामना एकहाती आपल्या नावावर केला. ज्यावेळी तो बाद होऊन माघारी परतला, त्यावेळी संघाला जिंकण्यासाठी अवघ्या ११ धावांची गरज होती. अश्विनने धावांचा पाठलाग करताना ४८ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ८३ धावांची तुफानी खेळी केली. या धावा त्याने १७२.९२ च्या स्ट्राईक रेटने केल्या.

या सामन्यात दिंडीगुल ड्रॅगन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रिची ग्रँड चोलस संघाकडून पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या वसीम अहमदने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. तर जाफर जमालने ३३ धावा केल्या. सुरेश कुमारने २३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या बळावर ट्रिची ग्रँड चोलस संघाने २० षटकांअखेर ९ गडी बाद १४० धावा केल्या.

दिंडीगुल ड्रॅगन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १४१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आर अश्विनने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली. तर बाबा इंद्रजीतने नाबाद २७ धावा करून संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.