Harjas Singh Triple Century: भारतीय वंशाचा खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघातील माजी खेळाडू हरजस सिंगने सिडनीत खेळताना विक्रमांचा पाऊस पाडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना शतक झळकावणं ही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. कारण बरेच फलंदाज आहेत. ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. तर बोटावर मोजता येतील असे खेळाडू आहेत, ज्यांना द्विशतकी खेळी करता आली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या हरजस सिंगने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडत वनडे ग्रेड क्रिकेटमध्ये पहिलं त्रिशतक झळकावलं आहे. ४ ऑक्टोबरला हरजस सिंगने वेस्टर्न सबर्ब्स संघाकडून खेळताना त्याने त्रिशतकी खेळी केली आहे.

हरजस सिंगने सिडनी क्रिकेट क्लब संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली आहे. हरजस सिंग वेस्टर्न सबर्ब्स संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. यादरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ७४ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. शतक पूर्ण झाल्यानंतर त्याच्या फलंदाजीचं रौद्ररूप पाहायला मिळालं. त्याने ६७ चेंडूत २१४ धावा चोपून काढल्या. या सामन्यात ५० षटकांअखेर त्याने १४१ चेंडूंचा सामना करत ३१४ धावांची विक्रमी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३५ गगनचुंबी षटकार मारले.

हरजस सिंगची विक्रमी त्रिशतकी खेळी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्टर्न सबर्ब्स संघाने ५० षटकांअखेर ५ गडी बाद ४८३ धावा केल्या. यादरम्यान ३१४ धावा या एकट्या हरजस सिंगने केल्या होत्या. मुख्य बाब म्हणजे इतर कुठल्याही फलंदाजाला अर्धशतकी खेळी देखील करता आलेली नाही. या संघाकडून सलामीला आलेल्या फलंदाजांना अवघ्या ३०-३० धावांचे योगदान देता आले.

असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

हरजस सिंग हा ग्रेड लेव्हल क्रिकेटमध्ये वनडे क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. हरजस सिंगचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आहे. पण त्याचे आई- वडील भारतीय आहेत. २००० मध्ये त्याचे आई- वडील सिडनीत स्थलांतरीत झाले होते. याआधी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंडर १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतही त्याने दमदार कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने ५५ धावांची खेळी केली होती.