आठवडय़ाची मुलाखत ई. भास्करन, यू मुंबाचे प्रशिक्षक
पाटणा पायरेट्सने प्रो कबड्डी लीगच्या मागील दोन्ही हंगामांमध्ये जेतेपद पटकावले आहे. यंदा पाचव्या हंगामात हॅट्ट्रिकचे स्वप्न बाळगणाऱ्या पाटणाला रोखण्याची क्षमता यू मुंबाकडे आहे, असा विश्वास यू मुंबाचे मुख्य प्रशिक्षक ई. भास्करन यांनी व्यक्त केला.
२०१५मध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या आणि दोन वेळा उपविजेत्या यू मुंबाच्या अभियानाला प्रारंभ हैदराबादला होणाऱ्या पुणेरी पलटणविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. विजयी सलामीनिशी यंदाच्या हंगामाला सुरुवात करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे भास्करन यांनी सांगितले. येत्या हंगामाविषयी भास्करन यांच्याशी केलेली खास बातचीत-
’यंदाच्या हंगामात प्रत्येक संघाला किमान २२ सामने खेळायचे आहेत. इतक्या आव्हानात्मक हंगामाकडे कशा रीतीने तुम्ही पाहता?
जेव्हा पाचव्या हंगामात चार संघ वाढणार हे निश्चित झाले, तेव्हापासूनच प्रदीर्घ चालणाऱ्या या हंगामाचा आमचा अभ्यास सुरू झाला होता. तंदुरुस्ती हे महत्त्वाचे आव्हान यू मुंबाच नव्हे, तर सर्व संघांपुढे असणार आहे. डेहराडूनला झालेल्या दोन शिबिरांमध्ये आम्ही तंदुरुस्तीवरच अधिक लक्ष केंद्रित केले. सामन्यांमध्ये पुरेसे अंतर असल्यामुळे त्याचा फारसा त्रास होणार नाही. या दृष्टीने आमची दुसरी सक्षम फळीसुद्धा तयार आहे. वारंवार खेळाडू बदलत राहावे लागणार आहेत.
’कर्णधार अनुप कुमार वगळल्यास संपूर्णत: नवा चमू तुम्हाला यंदा मिळाला आहे. याविषयी तुम्ही काय सांगाल?
अनुप हा एकमेव खेळाडू आणि कर्णधार पाचही हंगामांमध्ये यू मुंबासोबत राहिला आहे. शब्बीर बापू हा यू मुंबाच्या संघात पुन्हा परतला आहे, ही सुखद गोष्ट लिलावामध्ये घडली आहे. हादी ओश्तोरॅकसारख्या जगातील सर्वोत्तम बचावपटूला आम्ही संघात राखून शकलो, हेसुद्धा उत्तम झाले. बाकी काशिलिंग आडके, नीलेश मदने, कुलदीप सिंग अशा बऱ्याचशा खेळाडूंनी विविध संघांमधून कर्तृत्व गाजवले आहे. त्यामुळे बचाव आणि आक्रमण या दृष्टीने एक समतोल संघ यू मुंबाचा आहे.
’यंदाच्या हंगामात प्रत्येक संघात बऱ्याच प्रमाणात बदल दिसून येणार आहे. पण तुमच्या मते कोणते संघ आव्हानात्मक ठरू शकतील?
संघाची फक्त नावे बदलली आहेत. परंतु खेळाडू तेच आहेत. आतापर्यंत आठ संघांमध्ये असलेले खेळाडू आता १२ संघांमध्ये विभागले गेले आहेत. पुणे, जयपूर आणि उत्तर प्रदेशचे संघ चांगले आहेत.
’यू मुंबाचा पहिलाच सामना पुणेरी पलटणसोबत आहे. महाराष्ट्रातील या दोन संघांमधील सामन्याकडे येथे गांभीर्याने पाहिले जाते. याविषयी काय सांगाल?
दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक सर्वोत्तम खेळाडू असल्यामुळे हा सामना रंगतदार होईल, अशी आशा आहे. सलामीचा सामना जिंकल्यानंतर कोणत्याही संघाचा आत्मविश्वास उंचावतो, त्यामुळे विजयानिशीच हंगामाचा प्रारंभ करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
’अ-गटात समावेश असलेल्या यू मुंबाला कोणत्या संघांचे आव्हान जड जाईल?
पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्स हे दोन संघ अ-गटात आव्हानात्मक ठरू शकतील. याशिवाय दबंग दिल्ली आणि हरयाणा स्टीलर्सचे संघसुद्धा भक्कम आहेत.
’कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर सात दिवसांत सहा सामने खेळायचे आहेत, हे कितपत कठीण जाईल?
घरच्या मैदानाचा टप्पा कोणत्याही संघासाठी खडतर असेल. घरच्या मैदानावर यू मुंबा फारसे सामने गमावत नाही. हा रुबाब कायम राखण्याचा आमचा प्रयत्न असेल.
