Ubaid Shah Wicket Celbration In PSL 2025: पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. ज्या खेळाडूंना आयपीएल २०२५ स्पर्धा खेळण्याची संधी मिळालेली नाही, ते खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. या स्पर्धेतील १२ वा सामना लाहोर कलंदर्स आणि मुल्तान सुल्तान या दोन संघांमध्ये पार पडला. या सामन्यात असा एक क्षण आला, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. क्रिकेटमध्ये विकेट घेतल्यानंतर गोलंदाज वेगवेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत गोलंदाजानं विकेट घेतल्यानंतर असं काही सेलिब्रेशन केलं की यष्टिरक्षकावर जमिनीवर लोळण घेण्याची वेळ आली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

तर झाले असे की, मुल्तान सुल्तान संघातील गोलंदाज उबेद शाहने लाहोर कलंदर्स संघातील फलंदाज सॅम बिलिंग्सला बाद केलं. विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाने सेलिब्रेशन करणं साहजिक आहे. पण, संघातील खेळाडूला दुखापतग्रस्त करून सेलिब्रेशन करणं हे तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं असेल. विकेट घेतल्यानंतर उबेद इतक्या जोशमध्ये आला की, तो सेलिब्रेशन करीत असताना त्याचा हात यष्टिरक्षक उस्मान खानच्या डोक्याला जाऊन लागला. त्याला इतक्या जोरात झटका बसला, काही सेकंद त्याला काय चाललंय हेच कळत नव्हतं.

हे पाहून संघातील इतर खेळाडूही काही वेळासाठी घाबरले होते; मात्र काही मिनिटांनी उस्मानने इशारा केला की, मी ठीक आहे आणि मला काहीही झालेलं नाही. ही घटना मैदानावर खेळत असलेल्या खेळाडूंसाठी जितकी गंभीर होती, तितकीच क्रिकेट ???फॅन्ससाठी मजेशीरही??? होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर उबेदनं या सामन्यात दमदार गोलंदाजी केली. त्यानं या डावात गोलंदाजी करताना विरोधी संघातील तीन फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. या दमदार कामगिरीसह त्यानं मुल्तान सुल्तान संघाला या हंगामातील पहिला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मुल्तान सुल्तान संघाकडून यासिर खाननं सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली.

तर इफ्तिकार अहमदनं नाबाद ४० धावा केल्या. या खेळीच्या बळावर मुल्तान सुल्तान संघाला २० षटकांच्या अखेरीस २२८ धावा करता आल्या. लाहोर कलंदर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लाहोर कलंदर्स संघाला २० षटकांच्या अखेरीस ९ गडी बाद १९५ धावाच करता आल्या. लाहोरकडून सिकंदर रझाने नाबाद ५० धावांची खेळी केली आणि सॅम बिलिंग्सने ४३ धावा चोपल्या. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.