भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीला सुरूवात झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे. विजयी संघ कायम ठेवत विराट कोहलीने सर्वांना चकित केले.  भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सुत्रे घेतल्यापासून ३८ व्या कसोटीपर्यंत विराट कोहलीने संघात बदल केला होता. पण ३९ व्या कसोटीमध्ये विराट कोहलीने भारतीय संघात कोणताही बदल केला नाही. इंग्लंडच्या संघात मात्र दोन बदल करण्यात आले आहेत. जायबंदी ख्रिस वोक्सच्या जागी सॅम कुर्रानला, तर ओली पोपच्या जागी मोईन अलीला संधी देण्यात आली आहे.

‘चौथ्या कसोटीत खेळण्यासाठी सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. अश्विन तंदरूस्त झाला असून नेटमध्ये त्याने कसून सराव केला. ठरवून सतत संघात बदल केलेले नाहीत. अनेकवेळा दुखापतींमुळे संघात बदल करावे लागले. पण, आता तशी शक्यता कमी आहे आणि त्यामुळे चौथ्या सामन्यात संघात बदल करणे गरजेचे वाटत नाही’ असे विराट कोहलीने बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

पराभवांची मालिका खंडित करीत ट्रेंट ब्रिजवरील तिसरी कसोटी जिंकणारा भारतीय संघ गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत हे विजयी अभियान कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नॉटिंगहॅमच्या तिसऱ्या कसोटीत अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत २०३ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. मात्र तरीही भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे.