UPW vs DC Highlights in Marathi: युपी वॉरियर्जने वुमन्स प्रीमियर लीग २०२५ मधील पहिल्या विजयाचा आनंद लुटला आहेय. ग्रेस हॅरिसच्या हॅटट्रिकच्या जोरावर युपीने दिल्लीचा ३३ धावांनी पराभव केला. दीप्ती शर्माच्या नेतृत्त्वाखाली युपीचा यंदाचा हा पहिला विजय आहे. या विजयात चिनेल हेन्रीने ६२ धावांची खेळी करत तर ग्रेस हॅरिसने हॅटट्रिक घेत महत्त्वाचे योगदान दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यूपीने चिनेल हेन्रीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर २० षटकांत ९ गडी गमावून १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ १९.३ षटकात केवळ १४४ धावा करू शकला आणि सर्वबाद झाला.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात काही खास नव्हती. त्यांना पहिला धक्का पाचव्या षटकात २६ धावांच्या स्कोअरवर कॅप्टन मेग लॅनिंगच्या रूपात बसला. लॅनिंगला क्रांती गौरने क्लीन बोल्ड केले. तिला केवळ पाच धावा करता आल्या. तर सलामीवीर शेफाली वर्मा २४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. दिल्लीकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक ५६ धावांची खेळी खेळली. तिने ३५ चेंडूत ८ चौकार आणि एक षटकार ठोकला. याशिवाय मारिजन कॅपने ९ धावा, ॲनाबेल सदरलँडने ५ धावा, जेस जोनासनने ५ धावा, सारा ब्राइसने ५ धावा, निक्की प्रसादने १८ धावा आणि शिखा पांडेने १५* धावा केल्या.

तर अरुंधती रेड्डी आणि मिन्नू मणी यांना खातेही उघडता आले नाही. यूपीकडून क्रांती गौर आणि ग्रेस हॅरिसशिवाय चिनेल हेन्री आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ग्रेस हॅरिसने २.३ षटकांत १५ धावा देत ४ विकेट घेतल्या आणि तिने हॅटट्रिकही आपल्या नावे केली.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वेस्ट इंडिजच्या चिनेल हेन्रीने २३ चेंडूंत आठ षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. एका वेळेला यूपीची अवस्था खूपच वाईट होती, संघाने १४ षटकांत ९१ धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या. वेस्ट इंडिजची हेन्रीने १९व्या षटकात अरुंधती रेड्डीला तीन षटकार गमावत १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तिने २०२३ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गुजरात जायंट्सच्या सोफिया डंकलेच्या विक्रमाची बरोबरी केली. आठव्या क्रमांकावर आलेल्या हेन्रीच्या या खेळीच्या जोरावर यूपीने भक्कम धावसंख्या उभारली तर त्यांचे विशेषज्ञ फलंदाज काहीही करू शकले नाहीत.

दिल्लीच्या गोलंदाजांनी ८९ धावांत यूपीचे ६ विकेट घेतले होते. यूपीकडून किरण नवगिरेने २० चेंडूत १७ धावा केल्या. तत्पूर्वी, मारिजन कॅपने वृंदा दिनेशला (४) स्वस्तात बाद केले. जेस जोनासेनने दीप्ती शर्मा (१३) आणि ताहलिया मॅकग्रा (२४) यांची विकेट घेतली तर कॅपने १३व्या षटकात ग्रेस हॅरिस (२) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पण तरीही युपीने चांगलं पुनरागमन करत विजयाची नोंद केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upw beat dc by 33 runs with grace harris hattrick in wpl 2025 chinelle henry fifty bdg