आठवडय़ाची मुलाखत : चंद्रकांत पंडित, विदर्भाचे प्रशिक्षक
विदर्भातील क्रिकेट संस्कृतीवर या विजेतेपदाचा मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे. या संघाने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा आदर्श घेत येथील उदयोन्मुख पिढीमध्ये आपण रणजी विजेते होऊ शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे मत यंदाच्या रणजी विजेत्या विदर्भाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी व्यक्त केले.
‘‘विदर्भाची जबाबदारी घेतल्यानंतर आपण जिंकायसाठीच खेळतो आहे, हा विश्वास त्यांच्यात निर्माण केला. मग काही सामन्यांनंतर आपण जिंकूही शकतो, यावरचा सर्वाचा विश्वास वाढत गेला. रणजी करंडक जिंकण्याचा आम्ही इतिहास घडवला आहे. परंतु हे यश कायम राखणे आव्हानात्मक असते,’’ असे पंडित यांनी सांगितले. भारताचे माजी यष्टिरक्षक-फलंदाज पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रणजी संघांनी चार वेळा अंतिम फेरी गाठताना तीनदा विजेतेपद जिंकले आहे. फक्त मागील वर्षी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत गुजरातकडून पराभूत झाल्यामुळे मुंबईचे प्रशिक्षकपद पंडित यांना गमवावे लागले होते. विदर्भाच्या यशाबाबत आणि पंडित यांच्याशी केलेली खास बातचीत –
* विदर्भाच्या यशाचे रहस्य काय?
विदर्भालाही अनेक वर्षांचा क्रिकेटचा इतिहास गाठीशी होता. तिथे गुणवत्ता होतीच; परंतु आपल्या कामगिरीवर स्वत:चा विश्वास नव्हता. शिस्तबद्धता आणि सांघिक योगदान हे यशात महत्त्वाचे ठरले. त्यामुळे सामने जसजसे होत गेले, तसतसा निरनिराळ्या परिस्थिशी सामना करताना खेळाडूंचा आत्मविश्वास वाढत गेला. केरळविरुद्धचा सामना रंगतदार झाला होता. त्या सामन्यातूनही बरेच काही शिकायला मिळाले. एक संघ म्हणून जो खेळ उंचावत गेला, त्यालाच या यशाचे श्रेय द्यावे लागेल.
* विदर्भातील झुंजार वृत्तीबाबत काय सांगाल?
प्रत्येक वर्षी रणजी जिंकाल, असे आश्वासन कुणीही देऊ शकत नाही. पण मैदानावर गेल्यानंतर लढायचे, ही वृत्ती खेळाडूंमध्ये रुजवण्याची आवश्यकता असते. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर काही खेळाडू दुखापतग्रस्त होते. पण त्याची पर्वा त्यांनी केली नाही. रजनीश गुर्बानीने सामन्याला कलाटणी देणारे बळी मिळवले, त्या रात्री अशक्तपणामुळे त्याला सलाइन लावण्यात आले होते. पुढच्या दिवशी सकाळी सामन्यासाठी मैदानावर उतरण्यापूर्वीही त्याला सलाइन देण्यात आली होती. पण तरीही झुंजार वृत्तीने तो खेळला.
* तुमच्याआधी सुलक्षण कुलकर्णी, पारस म्हांब्रे, साईराज बहुतुले यांच्यासारखे मुंबईकर प्रशिक्षक लाभल्यामुळे विदर्भाच्या संघात खडूसपणा आला का?
नक्कीच. ज्या संस्कृतीचा आपण भाग असतो, ती आपल्या रक्तात भिनत असते. दिल्ली, कर्नाटकचीही क्रिकेट संस्कृती मोठी आहे. मुंबईला ४१ वेळा रणजी विजेतेपदाचा इतिहास आहे. मुंबईचे जे प्रशिक्षक विदर्भाला मिळाले, ते सर्व जण रणजी खेळलेले आहेत. मुंबईच्या प्रशिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विदर्भाचा संघ घडत गेला. त्याचा निकाल फक्त या वर्षी मिळाला.
* विदर्भाच्या यशात वसिम जाफरची भूमिका किती महत्त्वाची होती?
रणजी क्रिकेटचा बराचसा अनुभव गाठीशी असल्यामुळे जाफरची भूमिका महत्त्वाची होती. याशिवाय माझ्यासोबत खेळण्याचा अनुभव असल्यामुळे त्याने अपेक्षेप्रमाणेच खेळ उंचावला. त्यामुळे संघाला या आदर्श खेळाडूचा अतिशय फायदा झाला.
* फैझ फझल आणि गुर्बानी यांच्या खेळाविषयी काय सांगाल?
फझलने शांतचित्ताने नेतृत्व करीत संघाला संघटित ठेवले. युवा खेळाडूंमध्येही विजेतेपदाचे स्वप्न जागवले. फझलकडे भारताकडून खेळण्याचा अनुभव असल्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना त्याचा फायदा झाला. उच्च पातळीवर खेळण्याची क्षमता आपल्याकडे आहे, हेच त्याने सिद्ध केले आहे. यंदाच्या हंगामात पाच शतके आणि एका अर्धशतकासह ९१२ धावा करणाऱ्या फझलने निवड समितीला विचार करायला लावला आहे. युवा वेगवान गोलंदाज गुर्बानीने या स्पर्धेत अनेक महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली आहे. बऱ्याचदा कठीण परिस्थितीतून त्याने संघाला तारले आहे. त्याच्याकडे चांगली फलंदाजीचीही क्षमता असल्यामुळे गुणी अष्टपैलू खेळाडू म्हणून तो भविष्यात भारतासाठी खेळू शकेल.
