ICC ODI World Cup 2023: सलग दोन सामने जिंकल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये पोहोचला. येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शनिवारी १४ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. हा विश्वचषकाचा बारावा सामना असणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. पाकिस्तान संघ अहमदाबादमध्ये दाखल झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्सने पराभव केला होता. पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला, तर पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा ८१ धावांनी पराभव केला.

तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. वर्ल्डकपचे पहिले दोन सामने त्यानी हैदराबादमध्ये खेळले. पाकिस्तानी संघ बुधवारी दुपारी अहमदाबादला रवाना झाला होता. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले असण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या विश्वचषकाचा पहिला सामना या स्टेडियममध्ये विद्यमान चॅम्पियन इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला, जिथे प्रेक्षकांची उपस्थिती कमी होती. यावरून भारतीय बोर्डावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली होती.

विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सातवेळा आलेत आमनेसामने –

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आतापर्यंत सातवेळा आमनेसामने आले आहेत. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान संघाला अद्याप भारताचा पराभव करता आलेला नाही. टी-२० विश्वचषकातही भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अनेक वर्षे अजिंक्य राहिला होता, पण २०२१ मध्ये टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची अजिंक्य मालिका खंडित झाली. मात्र, २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानकडून त्या पराभवाचा बदला घेतला.

हेही वाचा – ICC ODI Rankings: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळीचा विराट-राहुलला क्रमवारीत झाला फायदा, पाहा आयसीसीची ताजी वनडे रॅकिंग

रिझवान आणि शफीक यांनी श्रीलंकेविरुद्ध झळकावली शतकं –

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने विश्वचषकात विश्वविक्रम केला. पाक संघाने ३४५ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले. विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही संघाने पाठलाग करताना केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात दोन्ही संघांकडून एकूण ४ शतके झळकावण्यात आली. पाकिस्तानकडून यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी शतके झळकावली, तर श्रीलंकेसाठी कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमाने शतकी खेळी केली. विश्वचषकाच्या एका सामन्यात ४ शतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली.