भारताच्या विकास मलिक (६० किलो), सुमित संगवान (८१ किलो) व सतीशकुमार (९१ किलोवरील) यांनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. भारताच्या शिवा थापा (५६ किलो) व मनोजकुमार (६४ किलो) यांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल  केली आहे.
उपांत्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंचे कांस्यपदक निश्चित होत असल्यामुळे भारताच्या या पाच खेळाडूंकडून पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. भारताचे पाच खेळाडू प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत.
विकास याने पाचवा मानांकित व माजी युरोपियन रौप्यपदक विजेता खेळाडू मिक्लोस व्हेरेगा याच्यावर २-१ असा सनसनाटी विजय मिळविला. या लढतीमधील पहिल्या फेरीत विकास पिछाडीवर होता. मात्र नंतरच्या दोन फेऱ्यांमध्ये त्याने आक्रमक खेळ करीत विजय संपादन केला. त्याला आता ब्राझीलच्या रॉब्सन कोन्सेकेओ याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
संगवान या २० वर्षीय खेळाडूने आठव्या मानांकित सिआरहेई नोविकेऊ या बेलारुसच्या खेळाडूवर ३-० अशी मात केली. त्याला उपांत्यपूर्व फेरीत माजी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडू आदिबेक नियाझीबेतोव्ह याच्याशी खेळावे लागणार आहे. तो म्हणाला,की मी माझ्या नैसर्गिक खेळावर भर दिला होता. प्रत्येक संधीचा लाभ घेण्याचे मी ठरविले होते. त्यामुळेच मी सुरुवातीपासून आघाडी मिळवू शकलो. आदिबेकविरुद्धही तोच दृष्टिकोन ठेवीत खेळणार आहे.
सतीश याने बेलारुसच्या यान सुदझिलोस्की याच्यावर ३-० असा दणदणीत विजय नोंदविला. त्याने ही लढत जिंकताना सातत्याने चाली करण्याचे ध्येय ठेवले होते व त्यामध्ये त्याला यश मिळाले. सतीश याला लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता इव्हान दिचको याच्याशी खेळावे लागणार आहे.
भारताचे प्रशिक्षक गुरुबक्षसिंग संधू यांनी खेळाडूंच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करीत सांगितले,की एकाच वेळी पाच खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता त्यामध्ये किती खेळाडू पदक मिळवितात याबाबत उत्सुकता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikash malik sumit sangwan satish singh in world boxing championships quarters