Bengaluru Stadium Stampede: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आयपीएल २०२५ मध्ये स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. आयपीएलच्या १८व्या हंगामात आरसीबीने अंतिम फेरीत पंजाब किंग्सचा पराभव केला आणि जेतेपदावर नाव कोरलं. या विजयानंतर आरसीबीचे सर्व खेळाडू आणि चाहतावर्ग जेतेपदाच्या विजयाचा जल्लोष साजरा करत होता. पण यानंतर ४ जुलैच्या विक्ट्री परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये चाहत्यांनी आपला जीव गमावला आणि या आनंदाचं दु:खात रूपांतर झालं. विराट कोहलीने पहिल्यांदाच या प्रकरणावर वक्तव्य करत हळहळ व्यक्त केली आहे.

आरसीबी फ्रँचायझीने आपल्या चाहत्यांबरोबर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ४ जून रोजी बेंगळुरूमध्ये विजयी परेड आयोजित केली होती, परंतु या परेडमधील चेंगराचेंगरीमुळे हा आनंद दु:खात बदलला. मोठ्या संख्येने चाहते पोहोचल्यामुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. आता या संपूर्ण प्रकरणात आरसीबी संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचं वक्तव्य समोर आलं आहे.

आरसीबी संघाने विराट कोहलीचं वक्तव्य एका पोस्टद्वारे शेअर केलं आहे. आरसीबी फ्रँचायझीने तीन महिन्यांनंतर पहिल्यांदा सोशल मीडिया पेजवर २८ ऑगस्टला पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांसाठी एक पत्र लिहिलं. यानंतर संघाने मृत्यू पावलेल्या चाहत्यांना आरसीबी केअर्सच्या माध्यमातून २५ लाखांची मदत जाहीर केली. यानंतर आता ३ सप्टेंबर रोजी संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू विराट कोहलीचं चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत वक्तव्य पोस्ट करत आरसीबीने शेअर केलं आहे.

विराट कोहली बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर पहिल्यांदाच झाला व्यक्त

विराट कोहली ४ जुलैला झालेल्या प्रकरणाबाबत म्हणाला, “४ जूनच्या व्यथित करणाऱ्या घटनेतून आपण कसं सावरावं? यासाठी मनाची तयारीच होत नाही. आपल्या फ्रँचायझीच्या इतिहासातील हा सर्वात आनंदाचा क्षण असायला हवा होता, पण तो एखाद्या दु:खद घटनेत रूपांतरित झाला. ज्या चाहत्यांनी या घटनेमध्ये आपले प्राण गमावले आणि ज्यांना दुखापत झाली, मी त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहे. तुम्ही जे गमावलं त्याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही, पण तुम्ही आमच्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहात. आपण सगळे मिळून जबाबदारीने पुढे जाऊ.”

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझीने आरसीबी केअर्सच्या माध्यमातून बंगळुरूतील विक्ट्री परेडदरम्यान चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. या घटनेत सुमारे ३३ जण जखमीही झाले आहेत.

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेशही देण्यात आले होते, त्यानंतर आजपर्यंत बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आलेला नाही. तर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे सामने आता नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.