Who Will Replace Virat Kohli Replacement In Test Cricket: भारतीय संघातील स्टार फलंदाज रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृ्त्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे बीसीसीआय सध्या नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. येत्या काही दिवसांत भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत नवा कर्णधार संघाचं नेतृ्त्व करताना दिसेल. दरम्यान आता रोहित पाठोपाठ विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, बीसीसीआयने त्याला फेरविचार करण्यास सांगितले आहे.
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, बीसीसीआयने त्याला स्पष्ट होकार किंवा नकार दिलेला नाही. येत्या काही दिवसांत इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली जाणार आहे. हा दौरा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे रोहितनंतर विराटसारखा अनुभवी खेळाडू संघात असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याला या निर्णयावर फेरविचार करावा असं सांगितलं आहे. आता विराट काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान विराटने निवृत्ती घेतली, तर त्याच्या जागेवर कोणाला संधी मिळू शकते? जाणून घ्या.
करुण नायर-
करूण नायर हा वीरेंद्र सेहवागनंतर कसोटी तिहेरी शतक झळकावणारा दुसराच भारतीय फलंदाज आहे. त्याची फलंदाजी टेक्निक पाहता, तो कसोटीत मधली फळी सांभाळू शकतो. गेल्या एक दशकापासून विराट कसोटीत चौथ्या क्रमांकावर खेळतोय. करूण नायर ही जागा घेऊ शकतो.
रजत पाटीदार-
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा कर्णधार रजत पाटीदार कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची जागा घेऊ शकतो. २०२४ मध्ये त्याला इंग्लंडविरूद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली जाऊ शकते.
साई सुदर्शन-
आयपीएल २०२५ स्पर्धेत साई सुदर्शनच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्याला २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने २ अर्धशतकं झळकावली होती. आयपीएल २०२५ स्पर्धेतही त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याचा फॉर्म पाहता, त्याला कसोटी संघात स्थान दिले जाऊ शकते.