सराव सामन्यांमध्ये पराभूत झाल्यावर वेस्ट इंडिजच्या संघाला साऱ्यांनीच दुबळा समजण्याची घोडचूक केली असली तरी पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांचा वारू चौफर उधळला. मालरेन सॅम्युअल्स हा त्यांचा फलंदाजीचा ‘अँग्री यंग मॅन ठरला’. आपल्या घाणाघाती फटक्यांच्या जोरावर त्याने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडत चौफेर फटकेबाजी केली. बेदरकार फटक्यांच्या जोरावर त्याने नाबाद शतकी खेळी साकारली आणि संघाला ६ बाद ३२१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय ‘शेर’ १९७ धावांवरच ढेर झाले आणि वेस्ट इंडिजने १२४ धावांनी विजय मिळवत साऱ्यांनाच जोरदार धक्का दिला.
भारताने नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी पाचारण केले. वेस्ट इंडिजची सुरुवात आश्वासक झाली नसली तरी सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजच्या डावाला गती दिली. सुरुवातील सावध पवित्रा घेतलेल्या सॅम्युअल्सने स्थिरस्थावर झाल्यावर मुक्तपणे फलंदाजी केली. सुरेश रैनाला ‘लाँग ऑन’ला षटकार ठोकत अर्धशतकासह कारकिर्दीतील चार हजार धावांचा टप्पा गाठला. अर्धशतक झळकावल्यावर सॅम्युअल्सने भारतीय गोलंदाजांवर प्रहार करायला सुरुवात केली. एकाही भारतीय गोलंदाजाचा सामना करायला तो कचरला नाही. भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत त्याने शतक झळकावले. अर्धशतक झळकावण्यासाठी त्याने ६१ चेंडू घेतले असले तरी त्यानंतर शतकापर्यंत पोहोचायला त्याने ३८ चेंडूंचा सामना केला. ४५ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत सॅम्युअल्सने शतकाला गवसणी घातली, हे त्याचे कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले.
सॅम्युअल्सने ११६ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि चार षटकार लगावत नाबाद १२६ धावांची खेळी साकारली. या वेळी त्याला यष्टिरक्षक दिनेश रामदिनने चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६५ धावांची अमूल्य भागीदारी रचली. रामदिनने ५ चौकार आणि २ षटकारांच्या ६१ धावांची खेळी साकारली.
वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकदिवसीय क्रिकेटमधील ‘राजा’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भारतीय संघाला दोनशे धावांचा पल्लाही गाठता आला नाही. घडलेल्या घोडचुका आणि गाफीलपणा या वेळी भारतीय संघाला नडला. सलामीवीर शिखर धवनने ९ चौकारांच्या जोरावर ६८ धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही.
धावफलक
वेस्ट इंडिज : ड्वेन स्मिथ त्रि. गो. जडेजा ४६, ड्वेन ब्राव्हो झे. धवन गो. शमी १७, डॅरेन ब्राव्हो झे. धवन गो. मिश्रा २८, मालरेन सॅम्युअल्स नाबाद १२६, दिनेश रामदिन झे. जडेजा गो. शमी ६१, किरॉन पोलार्ड त्रि. गो. शमी २, आंद्रे रसेल झे. कोहली गो. शमी १, डॅरेन सॅमी नाबाद १०, अवांतर (बाइज ७, लेग बाइज ५, वाइड १७, नो बॉल १) ३०, एकूण ५० षटकांत ६ बाद ३२१.
बाद क्रम : १-३४-, २-९८, ३-१२०, ४-२८५, ५-२९६, ६-२९८.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-१-३८-०, मोहित शर्मा ९-०-६१-०, मोहम्मद शमी ९-१-६६-४, रवींद्र जडेजा १०-०-५८-१, अमित मिश्रा १०-०-७२-१, सुरेश रैना २-०-१४-०.
भारत : अजिंक्य रहाणे धावबाद २४, शिखर धवन त्रि.गो. सॅम्युअल्स ६८, विराट कोहली झे. सॅमी गो. टेलर २, अंबाती रायुडू झे. बेन गो, रसेल १३, सुरेश रैना त्रि. गो. ड्वेन ब्राव्हो ०, महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. सॅमी ८, रवींद्र जडेजा नाबाद ३३, भुवनेश्वर कुमार झे. सॅमी गो. सॅम्युअल्स २, अमित मिश्रा पायचीत गो. ब्राव्हो ५, मोहित शर्मा झे. टेलर गो. रामपॉल ८, मोहम्मद शमी त्रि. गो. रामपॉल ८, अवांतर (लेग बाइज १, वाइड १४) १५, एकूण ४१ षटकांमध्ये सर्व बाद १९७.
बाद क्रम : १-४९, २-५५, ३-८२, ४-८३, ५-११४, ६-१३४, ७-१३८, ८-१४६, ९-१५५, १०-१९७.
गोलंदाजी : रवी रामपॉल ८-०-४८-२, जेरॉम टेलर १०-१-५०-१, ड्वेन ब्राव्हो ६-०-२८-२, आंद्रे रसेल ४-०-२१-१, सुलेमान बेन ५-०-१६-०, डॅरेन सॅमी ५-०-२३-१, मालरेन सॅम्युअल्स ३-०-१०-२.
सामनावीर : मालरेन सॅम्युअल्स.