Pickleball Game Guide Rules, Format & Playing Tips: पिकलबॉल हा जगातील सर्वात वेगाने प्रसिद्ध होत असलेला खेळ आहे. खेळाडूंसह, प्रसिद्ध उद्योगपती आणि सेलिब्रिटी देखील या खेळाकडे आकर्षित होत आहेत. या खेळाचा शोध १९६५ मध्ये वॉशिंग्टनमध्ये लावला गेला. जोएल प्रिचर्ड, बिल बेल आणि बर्नी मॅक्क्यूलम असे ३ मित्र होते. या ३ मित्रांनी मिळून अशा खेळाचा शोध लावला, जो लहान मुलांसोबत मिळून खेळता येऊ शकतो. या तिघांनी बॅडमिंटनची नेट, टेबल टेनिसची बॅट आणि विफल बॉलचा (बेसबॉलमध्ये वापरला जाणारा बॉल) वापर करून पिकलबॉल या नव्या खेळाचा शोध लावला. अमेरिकेत हा खेळ खूप आधीपासून खेळला जात आहे. हा खेळ नेमका कसा खेळला जातो? खेळाचे नियम काय आहेत? जाणून घ्या.

पिकलबॉलचे नियम काय आहेत?

पिकलबॉल हा खेळ रॅकेट्सच्या इतर खेळांप्रमाणे एकेरी आणि दुहेरी प्रकारात खेळला जातो. एकेरी आणि दुहेरी प्रकारातील सामन्यासाठी कोटची लांबी आणि रुंदी सारखीच असते.

सर्व्हिस कशी केली जाते? (सिंगल सर्व्हिस)

पिकलबॉल खेळण्यासाठी जी रॅकेट वापरली जाते, तिला पॅडल असं म्हणतात. सर्व्हिस करताना पॅडल आणि चेंडूंचा संपर्क हा कंबरेच्या पातळीच्या वर नसावा. या खेळामध्ये ड्रॉप सर्व्हिसला परवानगी आहे. त्यामुळे सर्व्हिस करणारा खेळाडू चेंडू एक टप्पा आपटून सर्व्हिस करू शकतो. सर्व्हिस करताना पाय बेसलाईनच्या मागे असणं गरजेचं आहे. या खेळातही सर्व्हिस ही क्रॉस कोटमध्ये केली जाते. प्रत्येक खेळाडूला एकदाच सर्व्हिस करण्याचा प्रयत्न करण्याची परवागनी आहे.

दुहेरीत सर्व्हिस कशी केली जाते? (डबल्स सर्व्हिस)

दुहेरीत सर्व्हिसचे नियम वेगळे आहेत. दोन्ही खेळाडू चुक होईपर्यंत सर्व्हिस करू शकतात. प्रत्येक बाजूची पहिली सर्व्हिस ही उजव्या कोर्टातून केली जाते. जर गुण मिळाला तर सर्व्हिस करणारा खेळाडू हा उजव्या बाजूने सर्व्हिस करेल. जोपर्यंत सर्व्हिस करणारा खेळाडू हा चूक करत नसेल, तोपर्यंत सर्व्हिस सुरू राहते. त्यामुळे आळीपाळीने सर्व्हिस करावी लागत नाही.

गुण कसे दिले जातात?

या खेळात जी जोडी सर्व्हिस करत असेल त्याच जोडीला गुण मिळतात. जर सर्व्हिस करणाऱ्या जोडीने चूक केली, तर रिसीव्हिंग जोडीला गुण दिला जात नाही. तर त्या जोडीला सर्व्हिस मिळते. मग सर्व्हिस करताना गुण घेण्याची संधी असते. त्यामुळे हा गेम लवकर संपत नाही. सामना हा ११ गुणांचा असतो.

नॉन व्हॉली झोन

नॉन व्हॉली झोन हा कोर्टचा तो भाग आहे जो नेटच्या दोन्ही बाजूला ७ फिट पसरलेला असतो. या झोनमध्ये खेळताना खेळाडूंना काळजीपूर्वक खेळावं लागतं. या झोनमध्ये उभं राहुन खेळाडू स्मॅश करू शकत नाही. नेटच्या जवळ उभं राहुन खेळाडूंना रॅली करता येत नाही. जर एखादा चेंडू नॉन व्हॉली झोनमध्ये पडत असेल, तर तो मारता येऊ शकतो, पण चेंडू विरोधी खेळाडूच्या कोटमध्ये जाण्यापूर्वी नॉन व्हॉली झोनमधून बाहेर पडणं करणं गरजेचं आहे.