कोणत्याही संघात खेळाडू एकमेकांचे मित्र होऊन जातात. खेळताना, सराव करताना मैत्री वाढत जाते. ते एकमेकांना टोपण नावाने हाक मारतात. चेष्टामस्करी, गप्पाटप्पा, टिंगलटवाळ्या सुरू असतात. पाकिस्तान क्रिकेट संघातही एकाला टोपणनाव मिळालं आहे. तो खेळाडूंचा मित्रच आहे पण तो खेळाडू नाहीये.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाने श्रीलंकेविरुद्धच्या लढतीनंतर बोलताना सांगितलं की, ‘आमचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक शेन मॅकडरमॉट हे कसून मेहनत घेत आहेत. त्यांचा खेळाडूंशी चांगला सुसंवाद आहे. आम्ही त्यांना ‘रॉकस्टार’ म्हणतो. प्रत्येक खेळाडूचं क्षेत्ररक्षण चांगलं व्हावं, मैदानात ताळमेळ असावा यासाठी ते कसोशीने काम करतात’.
आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. संघाच्या बरोबरीने एक नाव सातत्याने चर्चेत आहे, ते म्हणजे शेन मॅकडरमॉट.कॉमेंट्रीदरम्यानही पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या या शिलेदाराचं कौतुक केलं. कोण आहेत शेन मॅकडरमॉट ? आणि काय होतंय त्यांच्या कामाचं कौतुक, जाणून घेऊया. ऑस्ट्रेलियाचे शेन डावखुरे फलंदाज आणि विकेटकीपर म्हणून खेळायचे. मात्र त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा कोणताही अनुभव नाही.
या वर्षीच जुलै महिन्यात बांगलादेश दौऱ्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेन मॅकडरमॉट यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनीच क्षेत्ररक्षणातून सुधारणा व्हावी यासाठी शेन यांच्या नावाची शिफारस केली होती. त्या विनंतीचा मान ठेवत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला. ४४वर्षीय शेन यांनी परफॉर्मन्स लेव्हल कोचिंगचे तीन टप्पे पूर्ण केले आहेत. यानंतर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय तसंच डोमेस्टिक संघांबरोबर काम केलं. यामध्ये बांगलादेश, श्रीलंका, क्रिकेट ऑस्ट्रेलिया, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन आणि क्रिकेट टास्मानिया यांचा समावेश आहे.
२०२२-२३ या कालावधीत ते बांगलादेश संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. खेळाडूंशी त्यांचा चांगला समन्वय होता. मात्र मुख्य प्रशिक्षक चंडिका हतुरासिंघे यांच्याशी पटत नसल्याच्या मुद्यावरून त्यांनी पद सोडलं. त्याआधी तीन वर्ष ते श्रीलंकेच्या संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. यादरम्यान त्यांनी श्रीलंका अ संघालाही मार्गदर्शन केलं.
बांगलादेश संघाबरोबरचं काम अचानक थांबल्यानंतर शेन यांनी अफगाणिस्तान संघाचं क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद स्वीकारलं. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना शेन यांच्या ज्ञानाचा फायदा झाला. आयसीसी टी२० वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने सेमी फायनलपर्यंत धडक मारली होती. त्यात शेन यांचा मोलाचा वाटा होता.
आंतरराष्ट्रीय संघांबरोबर काम करण्याआधी शेन २०१२ ते २०१९ या कालावधीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल क्रिकेट सेंटरमध्ये कार्यरत होते. ऑस्ट्रेलिया अ संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, अॅनालिस्ट म्हणून त्यांनी काम केलं.
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफ सदस्यांची संगीतखुर्ची सतत सुरू असते. बोर्डातील बंडाळ्यांमुळे, कधी अंतर्गत राजकारणामुळे तर कधी मानधनाच्या मुद्यावरून प्रशिक्षक सोडून जातात. काही वेळेस खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये भाषेचा मुद्दाही अडसर ठरतो. शेन यांनी मात्र पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंचा विश्वास कमावला आहे. यामुळेच सलमान अघाने शेन यांच्या योगदानासंदर्भात जाहीर कौतुक केलं.