India Australia Players Wearing Black Armbands: महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना आज ३० ऑक्टोबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये खेळवला जात आहे. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, तर भारतीय संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. दरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरले आहेत, पण यामागचं नेमकं कारण काय आहे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघाने सेमीफायनलसाठी संघात मोठे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात कर्णधार एलिसा हिली परतली आहे. तर जॉर्जिया वेयरहमच्या जागी सॉफी मॉलिन्यू खेळताना दिसणार आहे. तर भारतीय संघात शफाली वर्मा, क्रांती गौड व रिचा घोष परतल्या आहेत. उमा छेत्री व हरलीन देओल यांना संघाबाहेर जावं लागेल आहे.

१७ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडूचं मानेला चेंडू लागल्याने दुखापतीनंतर निधन

राष्ट्रगीतादरम्यान दोन्ही संघांचे सर्व खेळाडू व पंचही हातावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरलेले दिसले. पण यामागचं कारणही तितकंच धक्का देणारं आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे २९ ऑक्टोबरला एका १७ वर्षीय स्थानिक क्रिकेटपटूला जीवघेणी दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती.

वृत्तानुसार, मंगळवारी संध्याकाळी या तरुण क्रिकेटपटूच्या मानेवर चेंडू लागला. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला आणि त्याला मोनाश मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आलं आणि लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. जिथे तो या दुखापतीनंतर मृत्यूशी झुंज देत होता. या १७ वर्षीय क्रिकेटपटूचं नाव बेन ऑस्टिन असं होतं. ज्याचा आता या दुखापतीनंतर मृत्यू झाला आहे.

बेन ऑस्टिन या १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्याची प्राणज्योत मालवली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पोस्ट शेअर करत त्याच्या मृत्यूची बातमी दिली. या १७ वर्षीय खेळाडूला श्रद्धांजली म्हणून दोन्ही संघांचे खेळाडू या सेमीफायनल सामन्यात हातावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत.