इंदूर : गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेस आज, बुधवारपासून सुरुवात करणार असून सलामीला त्यांची न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. न्यूझीलंड संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश असल्याने ते विक्रमी सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देतील अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

न्यूझीलंडच्या संघाने वर्षभरापूर्वीच संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. अमिराती आणि भारतातील खेळपट्ट्यांमध्ये बरेच साम्य आहे. याचा न्यूझीलंड संघाला निश्चितपणे फायदा होईल. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संघातही गुणवान फिरकी गोलंदाजांची भरणा आहे. त्यामुळे यंदाही जेतेपदासाठी त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी मोलिन्यू आणि लेग-स्पिनर जॉर्जिया वेरहॅम या दोघीही दुखापतींतून सावरल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला सलामीच्या लढतीपूर्वीच बळकटी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाकडे अन्य लेग-स्पिनर अलाना किंगचा पर्यायही उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार एलिसा हिली, एलिस पेरी आणि बेथ मूनी यांच्यावरच असेल.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने नुकतीच भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली. भारतात झालेल्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ अशी सरशी साधली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतातील परिस्थिती आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. याचा फायदा त्यांना सलामीच्या लढतीतच मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

न्यूझीलंडच्या संघात कर्णधार सोफी डिव्हाइन, सुझी बेट्स, लिया ताहूहू, अमेलिया कर आणि मॅडी ग्रीन यांसारख्या अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना जॉर्जिया प्लिमर, पॉली इंग्लिस, इडन कार्सन आणि इझी गेझ या युवतींची साथ लाभेल. त्यामुळे या स्पर्धेची सुरुवातच धक्कादायक निकालासह करण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल.

वेळ : दुपारी ३ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.