बाकू : भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशला मंगळवारी ‘फिडे’ विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या डावात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे दोन भारतीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंच्या लढतीतील पहिल्या डावात १९ वर्षीय अर्जुन एरिगेसीने १८ वर्षीय आर. प्रज्ञानंदला ५३ चालींत पराभूत केले. एरिगेसीने योजनाबद्ध खेळ करताना काळय़ा मोहऱ्यांनीशी प्रज्ञानंदवर मात केली. त्यामुळे लढत ‘टायब्रेकर’मध्ये नेण्यासाठी प्रज्ञानंदला दुसरा डाव जिंकावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाच वेळचा विश्वविजेता कार्लसनने १७ वर्षीय गुकेशवर काळय़ा मोहऱ्यांनी खेळताना विजय मिळवला. या डावात ३४व्या चालीत गुकेशने चूक केली आणि कार्लसनने या संधीचा फायदा घेतला. अखेर ४८ चालींनंतर गुकेशने हार मान्य केली. या विजयानंतर उपांत्य फेरी गाठण्यासाठी आता कार्लसनला दुसऱ्या डावात केवळ बरोबरीही पुरेशी ठरणार आहे.

अन्य उपांत्यपूर्व लढतीत, भारताच्या विदित गुजराथीला स्थानिक खेळाडू निजात अबासोव्हने बरोबरीत रोखले. तर, लिनिएर डोमिंगेझ पेरेझला चांगल्या सुरुवातीनंतरही अमेरिकेच्याच फाबिआनो कारूआनाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup chess tournament arjun arigesi defeats r pragyanand amy