- कबड्डी विश्वचषकाचा थरार आजपासून
- दक्षिण कोरियाविरुद्ध भारताची सलामी
कबड्डीचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ हा भारतासोबत आहे. १९९०पासून सात आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच २००४ आणि २००७चे विश्वविजेतेपद भारताच्या खात्यावर जमा आहेत. त्यामुळे गुरुवारपासून अहमदाबादच्या द एरिना स्टेडियमवर सुरू होणाऱ्या तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेत भारताला जगज्जेतेपद मिळणार, ही काळ्या दगडावरील रेष मानली जात आहे. त्यामुळेच तब्बल नऊ वर्षांनी होणाऱ्या या विश्वचषकाबाबत ‘ सोळावं वरीस मोक्याचं’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
‘जग चढाईसाठी सज्ज’ हे ब्रीदवाक्य जोपासत पाच खंडांमधील १२ संघांमध्ये विश्वचषक कबड्डी स्पध्रेचा थरार रंगणार आहे. मात्र पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन बलाढय़ संघ नसल्यामुळे इराण हेच प्रमुख आव्हान भारतापुढे असणार आहे. अन्य देशांनीही विश्वचषक जिंकू, असा निर्धार आणि तयारी केली असली तरी त्यांचा अनुभव आणि कौशल्य हे पूरक ठरणारे नाही.
भारतासमोर गुरुवारी सलामीलाच दक्षिण कोरियाचे आव्हान असेल. प्रो कबड्डी लीग स्पध्रेत सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या यांग कुन ली याला भारतीय वातावरणात खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे. मात्र अशा अनेक कुन लींच्या खेळाची आम्ही कुंडली जाणतो, असा इशारा भारताचे प्रशिक्षक बलवान सिंग यांनी दिला आहे. विश्वचषकातील सुवर्णपदक १०० टक्के आम्हीच जिंकू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘‘कोरियाविरुद्धच्या लढतीत गुणसंख्या आणि गुणांमधील फरक हा माझ्यासाठी महत्त्वाचा असेल. काही सामने झाल्यावरच काही संघांबाबत रणनीती आखता येऊ शकते, कारण ते प्रथमच आंतरराष्ट्रीय क्षितिजावर चमकत आहेत,’’ असे सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा संघनायक अनुप कुमारने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘विश्वचषक ही महत्त्वाची स्पर्धा असल्यामुळे दडपण येणे स्वाभाविक आहे. मात्र भारतापेक्षा अन्य संघांवर ते अधिक असेल. नेतृत्व सांभाळणे कठीण असते.’’
मुख्य समन्वयक कुणीही होऊ शकतो -चतुर्वेदी
‘‘विश्वचषक कबड्डी स्पध्रेच्या व्यवस्थापक किंवा मुख्य समन्वयक पदावर महाराष्ट्राची व्यक्ती नेमण्याची आमची इच्छा होती. या संदर्भात आम्ही विचारणासुद्धा केली होती. किशोर पाटील यांना मुख्य समन्वयक पदावर नियुक्त केल्याचे अधिकृत पत्रकसुद्धा काढले होते. परंतु अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. काही दिवसांत ते येथे दाखल होतील. त्यावेळी त्यांचा निर्णय कळू शकेल. मुख्य समन्वयक काय कुणीही होऊ शकतो किंवा त्यांनी पद स्वीकारले नाही तर अन्य सक्षम व्यक्तीला ते देता येईल,’’ असे मत भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे साहाय्यक सचिव देवराज चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. याशिवाय बडोद्याचे माजी रणजीपटू तुषार आरोठे यांच्याकडे संघाचे व्यवस्थापकपद सोपवण्यात आले आहे.
आजचे सामने
- वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
- भारत वि. दक्षिण कोरिया
- अमेरिका वि. इराण
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३.
