India vs South Africa 1st Test: ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यावर भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरला आहे. तर हा सामना जिंकणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत श्रीलंकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला. यासह दक्षिण आफ्रिकेने हा सामना ३० धावांनी आपल्या नावावर केला.
भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी
भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेत २-० ने विजय मिळवून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली होती. पण दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी घलरला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. त्यापैकी ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ५२ गुणांची कमाई केली आहे. तर विजयाची सरासरी ही ५४.१७ इतकी आहे.
तर भारतीय संघाला पहिल्याच कसोटीत पराभूत करून गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत खेळलेल्या ३ पैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत २४ गुणांची कमाई केली आहे. पण विजयाची सरासरी ६६.६७ इतकी असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या श्रीलंकेची विजयाची सरासरी देखील ६६.६७ इतकी आहे. पण दक्षिण आफ्रिकेचे गुण हे श्रीलंकेपेक्षा जास्त आहेत.
भारतीय संघाचा पराभव
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण असं काहीच झालं नाही. भारतीय संघाचा पहिला डाव १८९ धावांवर आटोपला. भारताला अवघ्या ३० धावांची आघाडी घेता आली.
दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव १५३ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२४ धावा करायच्या होत्या. मजबूत फलंदाजीक्रम पाहता, ही धावसंख्या भारतीय संघासाठी जास्त नव्हती. पण भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला आणि दक्षिण आफ्रिकेने हा सामना ३० धावांनी आपल्या नावावर केला.
