MS Dhoni Viral Video: कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून ५ वर्ष उलटली आहेत. मात्र, अजूनही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. अलीकडेच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे. धोनीने मदुराईतील एका स्टेडियमच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने मैदानात एंट्री मारताच युवा यष्टीरक्षकाने त्याचे पाय धरले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मदुराईत वेलाम्मल एज्युकेशन ट्रस्टकडून वेलाम्मल क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले आहे. हे स्टेडियम बनवण्यासाठी ३२५ कोटी रूपये इतका खर्च करण्यात आला आहे.या स्टेडियममध्ये एकावेळी ७,३०० प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. ही क्षमता २०,००० पर्यंत घेऊन जाण्याचा वेलाम्मल एज्युकेशन ट्रस्टचा प्रयत्न असणार आहे. या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी एमएस धोनीला आमंत्रण देण्यात आले होते. व्हायरल होत असलेला व्हिडीओ ९ ऑक्टोबरचा आहे.
धोनीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
उद्घाटनावेळी धोनीने बॅट घेऊन मैदानात एंट्री मारली. त्यावेळी मैदानात यष्टीरक्षण करत असलेल्या यष्टीरक्षकाने धोनीच्या पायांना स्पर्श केला आणि त्याचे आशीर्वाद घेतले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकरी युवा क्रिकेटपटूच्या ‘संस्कारांची’ आणि धोनीबद्दलच्या आदरभावनांची खूप प्रशंसा करत आहेत. क्रिकेट चाहत्यांनी सुरक्षा रक्षकांना चकवून मैदानात येऊन धोनीची भेट घेण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण हा युवा खेळाडू नशिबवान आहे, कारण एमएस धोनी स्वत: मैदानात आला.
धोनी स्टेडियमच्या उद्घाटनासाठी येणार ही माहिती मिळताच क्रिकेट चाहत्यांनी तुफान गर्दी केली. विमानतळावर देखील क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. आपल्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी लोकं आतुरतेने वाट पाहत होते. गर्दी नियंत्रणात आणणं खूप कठीण झालं होतं. पण पोलिसांनी त्याला सुरक्षित विमानतळाच्या बाहेर काढलं. या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी धोनीने काळ्या रंगाचं टी-शर्च परिधान केलं होतं.