भारताला २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलल्यानंतर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कर्करोगावर मात करून पुन्हा मैदानावर परतणारा लढवय्या क्रिकेटपटू युवराज सिंगने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मुंबईत निवृत्तीची घोषणा करताना त्याला आपले अश्रू रोखणे कठीण गेले.

उंचापुऱ्या युवराजकडे क्रिकेटसाठी अनुकूल विपुल गुणवत्ता होती. प्रतिस्पर्धी गोलंदाजावर आक्रमण करणारी डावखुरी फलंदाजी, मोक्याच्या क्षणी बळी मिळवणारी डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण ही त्याची वैशिष्टय़े. कसोटी क्रिकेटमध्ये तो आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध करू शकला नाही. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र त्याने अनेक सामने गाजवले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकातील सहाही चेंडूंवर षटकार मारण्याचा त्याचा पराक्रम क्रिकेटजगतात आजही डोळ्यांचे पारणे फेडतो. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात त्याने १२ चेंडूंत ५० धावा करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता.

‘‘२२ यार्डाच्या खेळपट्टीवरील गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत १७ वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द माझ्यासाठी स्वप्नवत होती. क्रिकेटने मला सर्व काही दिले आणि म्हणूनच आज मी इथे उभा राहू शकलो. परंतु निवृत्तीची हीच योग्य वेळ असल्याचे लक्षात आल्यामुळे हा निर्णय मी घेत आहे,’’ अशा शब्दांत ३७ वर्षीय युवराजने आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘‘देशासाठी मी ४०० सामने खेळू शकलो, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्यावेळी मी ही कल्पनासुद्धा केली नव्हती,’’ असे युवराजने सांगितले. निवृत्तीनंतर आयुष्याचा आनंद लुटायचा आहे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने परवागनी दिल्यास आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळायचे आहे, असे त्याने स्पष्ट केले. परंतु तो यापुढे इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार नाही.

युवराजने ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यापैकी कसोटीत १९००, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८७०१ आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ११७७ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचे २२वे स्थान आहे, तर भारतीयांपैकी तो सातव्या स्थानावर आहे. याशिवाय त्याने ३६.५५च्या सरासरीने १११ एकदिवसीय आणि २८ ट्वेन्टी-२० बळी मिळवले आहेत.

‘‘खेळाशी माझे कडू-गोड नाते आहे. माझ्या जीवनात क्रिकेटचे स्थान काय आहे, ते मी शब्दांत उलगडू शकणार नाही. या खेळाने मला जिद्दीने लढायला शिकवले. जेव्हा आपण पडतो, तेव्हा धूळ झटकून पुन्हा उभे राहायचे आणि पुढे जायचे, हा मूलमंत्र क्रिकेटने दिला,’’ असे युवराजने सांगितले, तेव्हा अनेक आठवणी त्याच्या डोळ्यांसमोर दाटून आल्या होत्या.

२००४मध्ये लाहोरला पाकिस्तानविरुद्ध पहिले कसोटी शतक नोंदवले.. २००७च्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एका षटकात सहा षटकारांची आतषबाजी केली.. तर २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आक्रमक युवराजने मालिकावीर पुरस्काराला गवसणी घातली.. हे युवराजच्या क्रिकेट कारकीर्दीतील महत्त्वाचे क्षण ठरले.

२०११च्या विश्वविजेतेपदानंतर कर्करोगावर मात करून पुन्हा मैदानावर परतण्याचे आव्हान युवीने पेलले. कर्करोगापुढे मी पराभूत होणार नाही, हा निश्चय मी केला होता, असे युवराजने आत्मविश्वासाने सांगितले. परंतु त्यानंतर युवराजच्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक चढ-उतार आले. २०१२मध्ये तो आपला अखेरचा कसोटी सामना खेळला, तर २०१७मध्ये इंग्लंडविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना त्याला खेळता आला. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये युवराजने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. परंतु अपेक्षित सूर हरवलेल्या युवीला माफक संधी मिळाली. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली कारकीर्द बहरात आली. महेंद्रसिंह धोनी हा आवडता कर्णधार आहे तसेच श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन व ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा हे कारकीर्दीतील सर्वात आव्हानात्मक गोलंदाज असल्याचे युवराजने नमूद केले.

‘‘२०१४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात मला २१ चेंडूंत फक्त ११ धावाच करता आल्या. त्यामुळे माझी कारकीर्द संपल्याची जाणीव मला तीव्रतेने झाली. काहींनी मला तसे म्हणूनही दाखवले. परंतु स्वत:वरील विश्वास ठेवणे, मी थांबवले नाही,’’ असे युवराजने सांगितले.

आयपीएल’लाही अलविदा

युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच नव्हे, तर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटलाही अलविदा केला. २०१५च्या आयपीएल’मध्ये तो सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला होता, परंतु यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये त्याला मूळ किमतीतच मुंबई इंडियन्सने संघात स्थान दिले.

२०१५च्या ‘आयपीएल’साठी दिल्ली संघाने युवीसाठी विक्रमी १६ कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये त्याच्या पदरी निराशा पडली. यासंदर्भात तो म्हणाला, ‘‘यंदाचे वर्ष माझे ‘आयपीएल’मधील अखेरचे असणार हे गेल्याच हंगामात मी ठरवले होते.

मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करत असल्यामुळे ‘आयपीएल’साठी उपलब्ध नसेन. परंतु देशाबाहेरील ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळण्याचा मी गांभीर्याने विचार करीत आहे,’’ असे युवराजने सांगितले.

विश्वविजेतेपदाच्या स्वप्नाला कर्करोगाच्या वास्तवाने तडा..

मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज आणि महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूची वाट दाखवणारा हुकमी गोलंदाज ही युवराजची प्रमुख ओळख होती. याच अष्टपैलुत्वाच्या बळावर त्याने २०११ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा गाजवली.

२ विश्वचषक स्पर्धेत तीनशेहून अधिक (३६२) धावा आणि १५ बळी मिळवणारा तो एकमेव खेळाडू ठरला. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरणाऱ्या युवराजच्या खात्यावर चार सामनावीर पुरस्कारसुद्धा जमा होते.

३ २०११चा विश्वचषक जिंकणे, चार सामनावीर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरणे, हे सारे माझ्यासाठी स्वप्नवतच होते. परंतु कर्करोगाचे निदान झाल्याच्या सत्याने मला खाडकन जाग आणली. हे सारे काही झटपट घडले आणि त्यावेळी मी कारकीर्दीच्या शिखरावर होतो. या कठीण कालखंडात माझे कुटुंबीय आणि मित्र खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, असे युवराजने सांगितले.

४ कर्करोगातून सावरल्यानंतरचे मैदानावरील पुनरागमन हे माझ्यासाठी अत्यंत दडपणाचे ठरले. कारण मी पुन्हा तसाच बहारदार खेळ दाखवू शकणार नाही, अशी प्रत्येकाची धारणा होती. परंतु मला त्या सर्वाना चुकीचे ठरवायचे होते, असे युवीने सांगितले.

‘‘माझ्या आयुष्यात यशापेक्षा अपयश अधिक वेळा आले. परंतु कधीही हार मानली नाही. अखेरच्या श्वासापर्यंत हार न मानण्याची शिकवण मला क्रिकेटने दिली. देशाचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली, तेव्हा मनापासून खेळलो.

– युवराज सिंग